सोमेश्वरनगर : ’सोमेश्वर’च्या उपाध्यक्षपदी कोणाला संधी? शुक्रवारच्या निवडीकडे सभासदांचे लक्ष | पुढारी

सोमेश्वरनगर : ’सोमेश्वर’च्या उपाध्यक्षपदी कोणाला संधी? शुक्रवारच्या निवडीकडे सभासदांचे लक्ष

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या नवीन उपाध्यक्षांची निवड शुक्रवारी (दि. 30) होत असून,
कोणाला संधी मिळणार? याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. विद्यमान उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर यांचा उपाध्यक्षपदाचा वर्षभराचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पाच वर्षांत पाच उपाध्यक्ष होणार असल्याने पाच संचालकांना या पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे.

याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार हेच अंतिम निर्णय घेणार असून, ते आपले मत कोणाच्या पारड्यात टाकतात, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. सध्याच्या संचालक मंडळातील संग्राम सोरटे, बाळासाहेब कामथे, अनंत तांबे, प्रणिता खोमणे यांची नावे चर्चेत आहेत. राज्यातील अग्रेसर असलेल्या सोमेश्वर कारखान्यात कामाची संधी मिळावी यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात.

सोमेश्वर कारखान्याची पंचवार्षकि निवडणूक गेल्या वर्षी 12 ऑक्टोबर 2021 ला पार पडली होती. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसपुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनेल व सोमेश्वर परिवर्तन पॅनेलमध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने एकहाती विजय मिळवला होता. 8 नोव्हेंबर 2021 रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड पार पडली होती.

अध्यक्षपदी पुरुषोत्तम जगताप यांना तिसर्‍यांदा संधी देत अजित पवार यांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. उपाध्यक्षपदी होळ-मोरगाव या गट क्रमांक 3 मधील उच्चशिक्षित आणि कारखान्यात याअगोदर संचालक म्हणून काम केलेले आनंदकुमार होळकर यांना संधी मिळाली होती. होळकर यांचा वर्षभराचा कार्यकाळ संपल्याने नवीन उपाध्यक्ष कोण होणार याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुचवलेल्या संचालकालाच उपाध्यक्षपदाची लॉटरी लागणार आहे.

बारामती, पुरंदर, खंडाळा आणि फलटण या चार तालुक्यांत कार्यक्षेत्र असलेल्या सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्षपद मिळावे यासाठी इच्छुक संचालकांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. तरुण, अभ्यासू, सहकारातील जाण असलेल्या तरुण संचालकांना संधी मिळते की ज्येष्ठ संचालकांना संधी मिळणार हे शुक्रवारी स्पष्ट होणार आहे.

धक्कातंत्राचा अवलंब होणार!
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अजित पवार हे अनपेक्षित धक्कातंत्राचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारखाना इतिहासात आजपर्यंत महिला संचालकांना अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची संधी मिळाली नाही. त्यामुळे महिला संचालकांना संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Back to top button