खोरच्या ओढ्याची झाली गटारगंगा; शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर पुन्हा खोलीकरण आवश्यक | पुढारी

खोरच्या ओढ्याची झाली गटारगंगा; शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर पुन्हा खोलीकरण आवश्यक

खोर (ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील खोर गावात सन 2013 मध्ये शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर ओढा खोलीकरण करण्याचे काम हाती घेऊन ओढा खोलीकरण करण्यात आले होते. त्यानुसार या भागात ‘पाणी अडवा व पाणी जिरवा’ मोहीम यशस्वीरीत्या राबवून खोर गाव दुष्काळमुक्तीच्या दिशेने वाटचाल करू लागले. मात्र, आता पुन्हा खोरच्या ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साठला गेला असून खोरच्या ओढ्याला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभाग व खासदार निधीतून या ओढ्याचे शिरपूर पॅटर्न राबवून सन 2013 मध्ये हे काम हाती घेण्यात आले होते. तत्कालीन सरपंच ज्ञानेश्वर चौधरी यांनी विविध संस्थांच्या देणगी तसेच स्थानिक विकास निधीतून हे काम मार्गी लावले होते. मात्र, आता पुन्हा हा पॅटर्न खोर गावात राबवणे गरजेचे बनले गेले आहे.

सध्या ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साठला गेला असून ओढ्याचे पाणी जिरण्यास अडचण निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणावर काटेरी झुडपे वाढली गेली असून सध्यस्थितीत ओढ्याला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पावसाळ्यापूर्वीच ओढा खोलीकरण मोहीम प्रशासकीय पातळीवर हाती घेतली गेली तर भविष्यातील पाणीटंचाई दूर होणास मदत होणार आहे.

प्रशासकीय पातळीवर शिरपूर पॅटर्न गरजेचा
तत्कालीन जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी स्वतः खोर गावात येऊन या राबविण्यात आलेल्या ओढा खोलीकरणाची पाहणी केली होती. जवळपास 10 वर्षांनंतर पुन्हा ही मोहीम प्रशासकीय पातळीवर राबवणे सध्याच्या स्थितीत गरजेचे झाले आहे.

सन 2013 मध्ये ओढा खोलीकरण मोहीम हाती घेऊन दौंड तालुक्यात एक आदर्शयुक्त शिरपूर पॅटर्न खोर येथे राबविण्यात यश आले होते. अशाच पद्धतीने पुन्हा एकदा ही मोहीम हाती घेण्यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात येणार आहे.
                                                         – ज्ञानेश्वर चौधरी,
                                                          माजी सरपंच, खोर

Back to top button