धुळे : पुढारी वृत्तसेवा
मुंबई आग्रा महामार्गावर कारमध्ये विश्रांती घेणाऱ्या पुणे येथील भाविकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणा-या तिघांना अवघ्या सहा तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने गजाआड केले आहे. या कामगिरीबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपास पथकाला दहा हजार रुपयांचे पारितोषिक पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी जाहीर केले आहे.
फिर्यादी डॉक्टर कदम यांनी घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली. यावेळेस पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील हे उपस्थित होते.
पुणे येथील डॉक्टर राकेश अमरनाथ कदम हे अन्य भाविकांसमवेत उज्जैन येथे श्री महाकालेश्वर चे दर्शन घेऊन धुळे मार्गे परत जात होते. यावेळी मुंबई आग्रा महामार्गावर आर्वी शिवारात त्यांनी त्यांची एम एच 12 क्यू एल 80 17 क्रमांकाची कार विश्रांती करण्यासाठी थांबवली. काही वेळ विश्रांती करत असताना अचानक सहा ते सात अज्ञात दरोडेखोरांनी या गाडीच्या काचेवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कदम आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड आणि मोबाईल असा 25 हजाराचा ऐवज हिसकावून घेतला. यादरम्यान दरोडेखोरांनी बेदम मारहाण केल्याने दोघेजण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील तसेच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी समांतरपणे सुरू केला. या पथकाला दरोडेखोर हे एम एच 14 बी एक्स 15 73 क्रमांकाच्या कारमधून शिरपूर शहराच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. त्यामुळे हे पथक तातडीने शिरपूरच्या दिशेने रवाना झाले.
यावेळी चोरटे सेंधवाकडे जात असताना हाडाखेड गावाजवळ पोलीस पथकाने चोरट्यांच्या कारला अडवले .पोलीस आल्याचे पाहून कार मधून तिघांनी पलायन केले तर उर्वरित तिघांना पोलीस पथकाने ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता नांदेड जिल्ह्यातील राजेश परशुराम राठोड, जगदीश शिवाजी पवार आणि योगेश शंकर पवार अशी त्यांची नावे असल्याचे निदर्शनास आले. तर फरार झालेल्या गुन्हेगारांची नावे अंकुश पवार तसेच सलीम आणि छोटू असल्याचे निदर्शनास आले. या दरोडेखोरांच्या ताब्यातून सोन्याच्या दोन अंगठ्या तसेच गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुस सह मोबाईल फोन आणि रोकड जप्त करण्यात आली.
यातील आरोपी जगदीश पवार यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने औरंगाबाद मध्ये धुळे सोलापूर रस्त्यावर एका इनोव्हा गाडीतील व्यक्तीवर चाकूने वार करून त्याच्याकडील दागिने आणि रोकड लंपास केल्याची माहिती दिली. याचवेळी त्याने कन्नड तालुक्यात देखील अशाच प्रकारचा गुन्हा केल्याची माहिती पुढे आली आहे. या संदर्भात दरोड्याचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहे. तसेच आरोपी योगेश पवार यांच्यावर देखील लातूर जिल्ह्यात दोन आणि नांदेड जिल्ह्यात एक गुन्हा दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. या सर्व गुन्हेगारांना पोलीस कोठडीत घेऊन त्यांच्या चौकशीतून राज्यातील अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी व्यक्त केली आहे.