पुणे : कलिंगड, खरबूज झाले स्वस्त | पुढारी

पुणे : कलिंगड, खरबूज झाले स्वस्त

पुणे : थंडीची चाहूल लागताच मार्केट यार्डातील फळबाजारात पाणीदार कलिंगड व खरबूजाला मागणी घटली आहे. खरेदीदारांनी या फळांच्या खरेदीकडे पाठ फिरविल्याने घाऊक बाजारात किलोमागे दोन ते तीन रुपयांनी घसरण झाली आहे. महात्मा फुले मंडईतील फळबाजारात एका नगाची दर्जानुसार 50 ते 80 रुपयांना विक्री करण्यात येत आहे.

बाजारात बोरे, डाळिंब, पेरू, चिकूची आवक रोडावली आहे. थंडीमुळे मागणीही कमी आहे. मात्र, आवक-जावक कायम असल्याने या फळांचे भाव टिकून आहेत. बाजारात हंगामपूर्व द्राक्षांची आवक वाढली आहे. गोडीअभावी द्राक्षांना जेमतेम मागणी आहे. अन्य पेरूंची आवक घटल्याने गावरान पेरूच्या भावात वीस किलोंच्या क्रेटमागे शंभर रुपयांनी वाढ झाली आहे.

रविवारी (दि. 24) मार्केट यार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस 4 ट्रक, संत्री 10 ते 20 टन, मोसंबी 30 ते 40 टन, डाळिंब 15 ते 20 टन, पपई 20 ते 25 टेम्पो, लिंबे सुमारे 4 हजार ते साडेचार हजार गोणी, पेरू 500 क्रेटस, कलिंगड 35 गाड्या, खरबूज 10 ते 15 गाड्या, बोरे 1 हजार 500 पोती तर सीताफळाची 7 ते 8 टन इतकी आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे – लिंबे (प्रति गोणी) : 100-200, अननस : 70-270, मोसंबी : (3 डझन) : 350-550, (4 डझन) : 160-300, संत्रा : (10 किलो) : 400-800, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 80-250, गणेश : 10-40, आरक्ता 20-80. कलिंगड : 3-10, खरबूज : 10-25, पपई : 5-20, पेरू (20 किलो) : 350-450, चिक्कू (10 किलो) : 100-400, सीताफळ : 20-80, बोरे (10 किलो) : 50-530.

 

Back to top button