पुन्हा कोरोना… आता बस्स!

पुन्हा कोरोना… आता बस्स!
Published on
Updated on

नाशिक (उद्यम) : सतीश डोंगरे

कोरोना विषाणूने केवळ आरोग्यालाच हानी पोहोचविली नाही, तर अर्थकारणाचाही अनर्थ केला. कोरोनाच्या लाटांमध्ये असे एकही क्षेत्र नाही, जे होरपळून निघाले नसेल. विशेषत: उद्योग क्षेत्राची कोरोनामुळे अपरिमित हानी झाली. यातून सावरण्याचे प्रयत्न झाले. काही अपयशी ठरले तर काही अजूनही आपल्या उद्योगाची घडी बसविण्यासाठी धडपडत आहेत. अशात कोरोना पुन्हा परतल्याच्या बातम्या समोर येताच… आता बस्स! असे उद्गार समोर आले नाही तरच नवल.

चीनमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन बीएफ-७ या व्हेरियंटने थैमान घातल्याच्या बातम्या समोर येत असल्याने जगावर पुन्हा एकदा चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. भारतातील यंत्रणाही अलर्ट मोडवर आल्या असून, नागरिकांना वारंवार दक्ष राहण्याचे आवाहन केले जात आहे. मास्कचीही सक्ती घातली जात आहे. या बाबी जरी योग्य असल्या तरी, 'आजारापेक्षा उपचार भयंकर' अशी स्थिती होवू नये, असे सर्वांनाच अपेक्षित आहे. एकीकडे भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती वाढल्याचे सांगितले जात असतानाच, दुसरीकडे निर्बंधाच्या चर्चा सुरू झाल्याने कामधंद्याची घडी बसविण्याच्या आतच ती उसवणार काय? अशी चिंता आता उद्योजकांसह सामान्यांना सतावत आहे. कारण यापूर्वी लावलेल्या निर्बंधाच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. या निर्बंधांमुळे एक सर्वेनुसार देशातील ४२ उद्योग संकटात सापडल्याचे समोर आले. यातील बहुतांश स्टार्टअप, लघु आणि मध्यम उद्योग बंद पडले आहेत.

या सर्वेनुसार ३८ टक्के उद्योगांकडे रोख रकमेची टंचाई निर्माण झाली आहे. तर उर्वरीत ४ टक्के उद्योग हे लॉकडाऊननंतर निर्माण झालेल्या विविध अडचणींमुळे गुंडाळावे लागले आहेत. या सर्वेनुसार अनलॉक १ मुळे व्यवसायामध्ये कुठलाही सकारात्मक परिणाम झाला नसल्याचेही समोर आले आहे. तसेच व्यवसायाची गाडी विशेष पुढे सरकरली असेही दिसून आले नाही. त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या उद्योगांचे प्रमाण २७ टक्क्यांवरून वाढून थेट ४२ टक्के झाले आहे. कोरोना काळात सर्वाधिक फटका हा ऑटोमाबाइल उद्योगांना बसला आहे. नाशिकचे औद्योगिक क्षेत्र ऑटोमोबाइल उद्योगांसाठी ओळखले जाते. नाशिकमधील जवळपास सर्वच 'मदर इंडस्ट्री' ऑटोमोबाइल क्षेत्राशी संबंधित आहेत. लॉकडाऊन काळात या कंपन्या बराच काळ बंद ठेवाव्या लागल्याने, त्याचा मोठा आर्थिक फटका व्यवस्थापनासह कामगारांना सोसावा लागला. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ऑटोमोबाइल क्षेत्रातून दरवर्षी निर्माण होणारा रोजगारही मोठ्या प्रमाणात प्रभावीत झाल्याचे दिसून आले.

जॉब इंडस्ट्री व्यतिरिक्त रिटेल उद्योग, खाजगी दळणवळण व्यवस्थेमध्ये ट्रॅव्हल अँड टुरिझम, हॉटेल आणि रेस्टॉरेंट, बांधकाम, रियल इस्टेट, सिनेमा, अन्न प्रक्रिया, खेळ, चैनीच्या वस्तू, फर्निचर या उद्योगांनाही मोठा तोटा सहन करावा लागला. परिणामी रोजगार प्रभावित झाल्याने, त्याची झळ सर्वसामान्यांना बसल्याचे दिसून आले. पूर्वी कंपन्या भविष्यातील व्यवसाय वाढीसाठी कच्चा माल, मनुष्यबळ, यंत्रसामुग्री यांची जमवाजमव करून ठेवायचे. आता मात्र, बचावात्मक योजना आखाव्या लागत असल्याने मोजकाच कच्च्या मालाचा साठा, आवश्यक तेवढेच मनुष्यबळ, कमीक-कमी उर्जेचा वापर, शंभर टक्के यंत्रांचा पूर्णवेळ उपयोग, खर्च कमी करणे, दळणवळणाचे स्वस्त पर्याय शोधणे आदी उद्योगांची मार्गदर्शक तत्वे बनली आहेत. सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनी तर आपला आवाका आणखीनच मर्यादीत ठेवला आहे. यासर्व बाबी लक्षात घेता पुन्हा एकदा कोरोनाचे संकट कोणासही परवडणार नाही. अशात आपण सर्वांनी खबरदारी म्हणून आतापासून सुरक्षेच्या उपाययोजना केल्यास येऊ पाहणारा कोरोना परतवून लावणे शक्य होईल, हेही तितकेच खरे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news