

नाशिक (दिंडोरी) : 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' या म्हणीनुसार आई ही कुटुंबासाठी मोठा आधार असते. चांदवड तालुक्यातील धाेडंबे येथील त्र्यंबकराव बाबूराव उशीर, साेमनाथ उशीर, तुकाराम उशीर व सुरेश उशीर या चार भावांनी आई गीताबाई बाबूराव उशीर यांची 90 व्या वर्षी सहस्रचंद्रदर्शन साेहळा व ग्रंथतुला करत एक वेगळा आदर्श घालून दिला.
गीताईंचे ७५ दिव्यांनी सुवासिनींच्या हस्ते औक्षण करण्यात आले. याप्रसंगी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्यासह पाहुण्यांच्या हस्ते त्यांची श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ तुला करण्यात आली. दिव्यांग बांधव महिला भीमाबाई सदगीर, मीराताई रकिबे, सुनीता क्षीरसागर, सुनीता जाधव, जय जनार्दन अनाथ आश्रमाच्या संगीतामाई गुंजाळ व स्वच्छता कर्मचारी समाधान केदारे यांचा तुळस, ज्ञानेश्वरी व सांप्रदायिक शेला देऊन सत्कार करण्यात आला. संदीप जाधव, प्रा. संदीप जगताप, वडनेर भैरव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गौतम तायडे यांनी आईची महती सांगितली.