कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : देवीचे भगत असणारे भोपे मंडळींची देवीचा जागर करीत गावोगावी खेडोपाडी भटकंती सुरू झाली आहे. गळ्यात कवड्याची माळ, डोक्यावर कवड्याचा टोप, एका हातात दिवटी, बुधली तर दुसर्या हातात टाळ पेहराव करीत देवीचे हे भोपे आपल्या व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी येथे राहणारे सूर्यकांत सीताराम कदम हे कोपरगाव परिसरात कोटमगाव ते कोपरगाव पायी फिरत आले. त्यांचे आजोबा मुंजाजी वडील सिताराम आणि त्यानंतर सूर्यकांत याची तिसरी पिढी देवीचा वसा पुढे चालवत आहेत.
देवीचे भोपे हे प्रत्येकाच्या घरी हातात गोडेतेलाचा टेंभा, अंगावर तेलकट कपडे, डोक्यावर दीड किलोची व अंगावर एक किलो असा अडीच किलो कवड्यांचा साज व तेल घेण्यासाठी कमरेला मोठी बुधली, असा पेहराव त्यांचा आहे. दरमजल दरकोस रात्री ते भटकंती करतात. प्रत्येकाच्या घरी जाऊन ते देवीचा जागर करतात. त्यांना सुवासिनी औक्षण करतात. वर्षभरातून ते एकदा भटकंती करीत असल्याने त्यांना दक्षिणा, पौड, जुने कपडे, धान्य, दिवाळी फराळ आदी वस्तू दान म्हणून देतात. गावाच्या कुंभारवाड्यात ते एक दिवस वास्तव्य करतात, असे त्यांनी सांगितले देवीचे भोपे सूर्यकांत कदम म्हणाले, या भागात चार वर्षे दुष्काळी स्थिती असल्याने त्याचा फरक जाणवला.