Prajakta Mali : नाशिकचं हवापाणी, वातावरण प्रसन्न म्हणून मलाही घर घेण्याची इच्छा… | पुढारी

Prajakta Mali : नाशिकचं हवापाणी, वातावरण प्रसन्न म्हणून मलाही घर घेण्याची इच्छा...

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहराचे वातावरण इतके सुंदर आणि मनमोहक आहे की, या शहराच्या कोणीही प्रेमात पडू शकते. त्याचप्रमाणे सध्या होमेथॉन प्रदर्शनामध्ये विविध स्टॉलला भेट दिल्यानंतर त्यांच्यामार्फत घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा बघून मलाही नाशिकमध्ये घर घेण्याचा मोह होतो, अशी भावना प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी व्यक्त केली.

सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे २२ ते २५ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ असे चार दिवसांचे ‘होमेथॉन प्रदर्शन’ गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे सुरू आहे. यानिमित्त शक्रवारी (दि.२३) अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी निर्मिती ॲडव्हर्टायझिंगचे संचालक नंदन दीक्षित व निवेदिका किशोरी किणीकर या दोन्ही मुलाखतकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना प्राजक्ता यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. याप्रसंगी व्यासपीठावर नरेडकोचे नाशिकचे अध्यक्ष अभय तातेड व वंदना तातेड, होमेथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर व जयश्री ठक्कर, सचिव सुनील गवादे व गीता गवादे, होमेथॉनचे सहसमन्वयक शंतनू देशपांडे व आसावरी देशपांडे, टायटल स्पॉन्सर दीपक चंदे व दीपा चंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाल्या की, मुंबईमध्ये आता घर घ्यायला जागा नाही, पुण्यातही प्रचंड गर्दी झाली आहे. त्यामुळे साहजिकच सर्वांचा ओढा नाशिककडे दिसून येतो. त्यातच इथले हवा, पाणी आणि एकूणच वातावरण अत्यंत प्रसन्न, छान आणि सुंदर आहे. तसेच येथील निसर्गाचे वातावरण अत्यंत अल्हाददायक असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, यावेळी त्यांचे सहकलाकार व अभिनेता अंशुमन विचारे आणि अभिनेत्री प्रियदर्शनी इंदुलकर यांच्या प्राजक्ता माळींविषयी व्यक्त केलेल्या भावनांच्या ध्वनिफिती दाखवण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रारंभी त्यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेट देऊन तेथील गृहप्रकल्पांची माहिती घेतली. प्रारंभी माळी यांचा पैठणी तसेच चांदीची भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. जयेश ठक्कर आणि सुनील गवादे यांनी नारेडकोची तसेच होमेथॉन प्रदर्शनाची प्रास्ताविकात माहिती दिली. यावेळी माळींच्या हस्ते पुरुषोत्तम देशपांडे व शाल्मली देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चांदीचे नाणे भेट देऊन सत्कार करण्यात आला. नंदन दीक्षित व निवेदिका किशोरी किणीकर यांनी सूत्रसंचालन केले. शंतनू देशपांडे यांनी आभार मानले.

हिंदी चित्रपटात काम करण्याची इच्छा

यापुढे हिंदी चित्रपटातदेखील मला काम करायला आवडेल, परंतु हिंदीमध्ये काम करणे मराठी कलाकारांसाठी थोडीशी अवघड गोष्ट असते तसेच चित्रपट हे माध्यम मालिकेपेक्षा थोडेसे कठीण वाटते, असेही प्राजक्ता यांनी स्पष्ट केले. तसेच ‘रानबाजार’ या वेब सिरीजला चांगला प्रतिसाद मिळाला, परंतु त्या आधी ट्रिझर प्रसिद्ध झाला, तेव्हा काही चुकीच्या कॉमेंट आल्या होत्या, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button