नागपूर : पक्ष उभारणीसाठी जीवाचे रान करावे लागेल : राज ठाकरे

नागपूर : पक्ष उभारणीसाठी जीवाचे रान करावे लागेल : राज ठाकरे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : एकेकाळी काँग्रेसचा विदर्भ हा बालेकिल्ला होता. परंतु, तो आता भाजपचा बालेकिल्ला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष यातून गेला आहे. काही काळानंतर सत्तांतर होतच असतात, पक्ष उभारणीसाठी जीवाचे रान करावे लागते. मनसेच्याही वाट्याला यश, अपयश आले आहे. पण आपला पक्ष खचला नाही आणि खचणारही नाही. कोणत्याही पराभवानं खचून जाऊ नका, फक्त जमिनीवर पाय घट्ट रोवून उभे राहा, यश नक्कीच आपलं आहे; असा सल्ला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ठाकरे पुढे म्हणाले, जे लोकं आपल्यावर हसताहेत त्यांना हसू द्या. आज आमच्या शाखाध्यक्षांना बघून, हे पोर काय करणार असंही काही लोकं बोलत असतील, तर त्यांना बोलू द्या. पण मी विश्वास देतो की एकदिवशी हेच पोरं त्यांच्यावर वरवंटा फिरवणार, असा इशारा त्यांनी मनसेची खिल्ली उडविणाऱ्याना दिला. तुम्हाला निवडून हे पद देण्यात आलं आहे. त्या पदाची जबाबदारी ओळखा. तुम्ही कोणत्याही पदावर असला तरी दुसऱ्या पदाधिकाऱ्याला कधी तुच्छ मानू नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला.

गेले काही दिवस मनसेत सुरू असलेल्या राजीनामा, नाराजी नाट्याला देखील यानिमित्ताने त्यानी प्रत्युत्तर दिले. मनसेला पदाधिकाऱ्यांसाठी माणसं मिळत नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. ज्यांनी त्या बातम्या टाकल्या होत्या त्यांनी डोळ्यात अंजन घालावे असेही त्यांनी यावेळी बजावले. कोणत्याही पराभवानं खचून जाऊ नका, फक्त जमिनीवर पाय घट्ट रोवून उभे राहा, यश नक्कीच आपलं आहे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिली. आगमनाच्या वेळी विमानतळापासून वसंतराव देशपांडे सभागृहापर्यंत ढोल ताशाच्या गजरात प्रचंड जल्लोषात २७३ बाईक व २७ गाड्यांच्या रॅलीने जंगी स्वागत करण्यात आले.

नागपूर शहर व जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर घटस्थापनेच्या मुहूर्तावर दोन शहर अध्यक्ष विशाल बडगे व चंदू लाडे यांना पदनियुक्ती दिली गेली. यानंतर पाच शहर सचिव व सहा विभाग अध्यक्ष या पदाधिकाऱ्यांची शहर कार्यकारिणी घोषित केल्यानंतर काल कार्यकारिणीचा जम्बो विस्तार करण्यात आला. पक्षात खांदे पालटानंतर या पदनियुक्ती सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झाले होते. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच कार्यशाळा घेण्याचे सूतोवाच केले. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी जनतेत जावून त्यांचे प्रश्न सोडवा असे निर्देशही त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिले.

यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील, पक्षाचे नेते अविनाश अभ्यंकर, ॲड. जयप्रकाश बाविस्कर, सरचिटणीस व प्रवक्ते संदीप देशपांडे, सौ. रिटा गुप्ता, ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष व विदर्भ निरीक्षक अविनाश जाधव, प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकर, राजूभाऊ उंबरकर, आनंद एंबडवार, किशोर सरायकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news