US winter storm : अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा, १० ठार, २० कोटी लोक प्रभावित, ५ हजार विमान उड्डाणे रद्द | पुढारी

US winter storm : अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा, १० ठार, २० कोटी लोक प्रभावित, ५ हजार विमान उड्डाणे रद्द

वॉशिंग्टन; पुढारी ऑनलाईन : अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा (US winter storm) बसला आहे. यामुळे येथील २० कोटी लोक प्रभावित झाले आहेत. हिमवादळाशी संबंधित घटनांमध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ लाख लोकांच्या घरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. तसेच साडेपाच हजार विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. या शक्तिशाली वादळाचा फटका टेक्सास ते क्यूबेकपर्यंत ३,२०० किमी (२ हजार मैल) पेक्षा जास्त असलेल्या भागाला बसला आहे.

येथील वातावरणातील दाब कमी झाल्याने अमेरिका-कॅनडा सीमेवरील ग्रेट लेक्समध्ये हिमवादळाची परिस्थिती निर्माण झाली. या वादळाचा फटका कॅनडातील ओंटारियो आणि क्विबेक या प्रदेशाला बसला आहे, ज्यामुळे लाखो लोकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
अमेरिकेच्या नॅशनल वेदर सर्व्हिस (NWS) ने म्हटले आहे की शुक्रवारच्या नकाशावरुन हिवाळ्यातील हवामानाबाबत खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. एल्क पार्क, मोंटाना येथील तापमान उणे ४५ सेल्सियसपर्यंत घसरले आहे, तर मिशिगनमधील हेल शहरात हाडे गोठवणारी थंडी पडली आहे.

बीबीसीच्या वृत्तानुसार, दक्षिण डकोटामध्ये बर्फात अडकलेल्या अमेरिकन लोकांनी इंधन संपल्यानंतर थंडीपासून बचाव करण्यासाठी कपडे जाळले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. पेनसिल्व्हेनिया आणि मिशिगनमध्ये जोरदार बर्फवृष्टी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

हिमवादळामुळे रस्त्यावर अपघात झाले असून यात ओहियो राज्यातील दोन मोटरसायकलस्वारांचा मृत्यू झाला आहे. फ्लाईटअवेअरच्या ट्रॅकिंग साइटनुसार शुक्रवारी ५,६०० हून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामुळे ख्रिसमससाठी घरी जाणारे लोक विमानतळावर अडकून पडले आहेत. (US winter storm)

हे ही वाचा :

Back to top button