नाशिक : जातं फिरलं अन् खानदेशची संस्कृती प्रकटली, खानदेश महोत्सवाला सुरुवात | पुढारी

नाशिक : जातं फिरलं अन् खानदेशची संस्कृती प्रकटली, खानदेश महोत्सवाला सुरुवात

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

खानदेशची संपन्न संस्कृती उलगडणाऱ्या खानदेश महोत्सवाला शोभायात्रेने प्रारंभ करण्यात आला. मुख्य मंडपात मान्यवरांच्या हस्ते जाते फिरवून आणि अहिराणी ओव्या गात महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

ठक्कर डोममध्ये येत्या २५ डिसेंबरपर्यंत हा महोत्सव रंगणार आहे. त्याच्या उद्घाटनानिमित्त आ. सीमा हिरे आणि भाजप नेते महेश हिरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि हवेत फुगे सोडून विजयनगर येथून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. वाघ्या मुरळी पथक, बोहाड्यातील सोंगांचे आदिवासी समूहनृत्य, ढोलपथक विविध वेशभूषा केलेले विद्यार्थी, डोंबाऱ्यांचे खेळ, कानबाईची गाणी, लेजीम पथक याशिवाय बैलगाडी, उंटघोडे आणि चित्ररथ आदींचा समावेश असलेल्या शोभायात्रेने सिडकोवासीयांचे लक्ष वेधून घेतले. विजयनगर येथून निघालेली शोभायात्रा महाकाली चौक, पवननगर, रायगड चौक, दिव्या ॲडलॅब, त्रिमूर्ती चौक, सिटी सेंटर मॉलमार्गे तीन तासांनंतर ठक्कर डोम येथे पोहोचली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे नेते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जाते फिरवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका प्रतिभा पवार यांनी अहिराणी भाषेतली जात्यावरची ओवी सादर केल्याने कार्यक्रमात आगळी रंगत भरली गेली.

महोत्सवाच्या आयोजिका आमदार सीमा हिंरे यांनी प्रास्ताविकातून माणसं जोडणारा आणि अहिराणी भाषा, खानदेशी संस्कृती, परंपरा यांची नाशिककरांना ओळख व्हावी म्हणून हा महोत्सव करण्यात आल्याचे नमूद केले. महोत्सवाच्या संयोजिका रश्मी बेंडाळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

यावेळी माजी नगरसेवक योगेश हिरे, माजी नगरसेविका प्रतिभा पवार, माजी नगरसेविका अलका आहिरे, भाग्यश्री ढोमसे, पुष्पा आहाड, माधुरी बोलकर, छाया देवांग, इंदुमती नागरे, माजी नगरसेवक भगवान दोंदे, श्याम बडोदे, राकेश दोंदे, नीलेश ठाकरे, शहर सरचिटणीस जगन पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यानंतर अहिराणी साहित्य संमेलन आणि बहुभाषिक कविसंमेलन झाले.

आज महोत्सवात

१) सकाळी १० वाजता : महिला भजन स्पर्धा

२) सायंकाळी ६.३० वाजता : न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा

हेही वाचा :

Back to top button