सांगा… आम्ही जगायचं की मरायचं? | पुढारी

सांगा... आम्ही जगायचं की मरायचं?

शित्तूर वारुण; पुढारी वृत्तसेवा :  चांदोली अभयारण्यालगतच्या मानवी वस्तीमध्ये वन्यप्राण्यांकडून मानवावर होणार्‍या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. मनीषा रामू डोईफोडे या दहा वर्षांच्या मुलीचा बुधवारी बिबट्याच्या हल्ल्यात नाहक बळी गेला. यामुळे परिसरातल्या ग्रामस्थांकडून सांगा, आम्ही जगायचं की मरायचं…, असा सवाल केला जात आहे.

शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर व शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. याआधी गव्याच्या हल्ल्यांत पांडुरंग कदम या शेतकर्‍याचा बळी गेला आहे. तीन महिन्यांपूर्वीच बिबट्याच्या हल्ल्यातील श्रेयस वडाम हा शाळकरी मुलगा अतिदक्षता विभागातील उपचारानंतर वाचला आहे. गव्याच्या हल्ल्यामुळे जखमी असलेले सर्जेराव पाटील या शेतकर्‍यास आता अपंगाचे आयुष्य जगावे लागत आहे. अनिकेत आनुते हा शाळकरी मुलगा, शिवाजी पाटील व सुनीता पोळ हे शेतकरी बिबट्याच्या हल्ल्यात कसेबसे वाचले आहेत. याशिवाय आजपर्यंत परिसरातल्या अगणित पाळीव प्राण्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे.

चांदोली अभयारण्याच्या सीमेलगत कोणतेही तार फिन्सिंग कुंपण अथवा चर नसल्यामुळे अभयारण्यातील गव्यांच्या कळपांना व बिबट्यांना अन्न व पाण्याच्या शोधात थेट मानवी वस्तीत प्रवेश करता येत आहे. मानवी वस्तीशेजारचे डोंगर व शेतशिवारांनाच बिबट्या आपले जंगल समजू लागला आहे. त्यांच्या मूळ अधिवासाचे जंगल तो विसरलाच आहे. त्यामुळेच शेतशिवारात व घराशेजारी असलेल्या पाळीव प्राण्यांचे व आता लहान मुलांचे बिबट्यांच्या हल्ल्यात बळी जात आहेत.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एखादया व्यक्तीचा जीव जाणं हे दुर्दैवीच. मात्र अशा घटना घडू नयेत यासाठीच्या उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन त्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
– नानासाहेब लडकत
वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक सह्याद्री व्याघ— प्रकल्प

Back to top button