Corona Updates : कोरोना महामारी अद्याप संपलेली नाही! नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून राज्यांना सतर्कतेच्या सूचना | पुढारी

Corona Updates : कोरोना महामारी अद्याप संपलेली नाही! नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून राज्यांना सतर्कतेच्या सूचना

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : कोरोनामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकार अलर्ट झाले आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया आज दुपारी ३ वाजता राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत कोविड-१९ परिस्थिती आणि तयारीबाबत बैठक बोलावली आहे. अद्याप कोरोना महामारी संपलेली नाही. सतर्क रहा आणि सुरक्षा उपायांचे पालन करा, असे डॉ. मांडविया यांनी ट्विट करत म्हटले आहे. सण आणि नवीन वर्षाचे आगमन लक्षात घेता सावधगिरीचा उपाय म्हणून लोकांनी मास्क घालावा, सॅनिटायझरचा वापरा करावा आणि सोशल डिस्टन्सिंग राखावे, असा सल्लाही त्यांनी राज्यांना दिला आहे. (Corona Updates)

इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने चीनसह काही देशांमध्ये कोविड-१९ च्या वाढत्या रुणसंख्येच्या पार्श्वभूमीवर लोकांना लग्न समारंभ, राजकीय अथवा सामाजिक सभा तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान गर्दी टाळण्याचा सल्ला दिला आहे.

केंद्राकडून राज्यांना महत्वाच्या सूचना….

कोरोना महारोगराईचे संकट पुन्हा एकदा जगावर घोघांवत असतांना केंद्र सरकारने राज्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर देशातील कोरोनास्थितीसंबंधी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी गुरूवारी लोकसभेत निवेदन सादर केले होते. जगाच्या तुलनेत भारतातील कोरोनास्थितीची माहिती यावेळी त्यांनी सभागृहाला दिली. मांडिविया म्हणाले, जगातील ५.८७ लाख दैनंदिन कोरोनाबाधितांच्या तुलनेत भारतात दररोज सरासरी १५३ कोरोनाबाधित आढळत आहेत. जापान, दक्षिण कोरिया,अमेरिका, इटली, फ्रान्स, ग्रीस सारख्या देशात कोरोनाबाधितांसह मृत्यू संख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे.

जगभरात कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता केंद्राने आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून येणाऱ्या २ टक्के प्रवाशांची रॅन्डम आरटीपीसीआर तपासणी सुरू केली आहे. आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात आली आहेत. नवीन व्हेरियंट वेळीच ओळण्यासाठी राज्यांना ‘जीनोम सिक्वेंसिंग’चा सल्ला दिला आहे. आगामी सण तसेच नूतनवर्ष लक्षात घेता राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना मास्क घालणे, हात स्वच्छ ठेवणे, डिस्टसिंग ठेवण्यासंबंधी जागरूकता आणण्याची गरज आहे. शिवाय बूस्टर डोसचे प्रमाण वाढवण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता वाढवण्याच्या आवश्यकतेवर मांडविया यांनी भर दिला.

देशात आतापर्यंत २२०.०२ कोटी लसीकरणाचा विक्रम करण्यात आला आहे. ९० टक्के पात्र लोकसंख्येला दोन्ही लसी लावण्यात आल्या आहेत. तर, २२.३५ कोटी नागरिकांना बूस्टर डोस लावण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालय जागतिक स्थितीवर नजर ठेवून आहे. सरकारच्या प्रयत्नामध्ये सर्वांनी सहकार्य करावे. कोरोना महारोगराई अद्याप संपेलली नाही. बूस्टर डोस लावून आपला बचाव करणे आवश्यक आहे. कोरोनाविरोधातील सामूहिक लढा सुरु ठेवण्याची आवश्यकत असल्याचे मांडविया म्हणाले.

पंतप्रधानांनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशातील कोरोना स्थिती, आरोग्य पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिकची तयारी, देशातील लसीकरण मोहिमेची स्थिती आणि कोरोनाचे नवीन प्रकार आणि त्यांचे सार्वजनिक स्वरूप यांचे मूल्यांकन करण्यासाठी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक झाली. ही उच्चस्तरीय आढावा बैठक काही देशांमध्ये प्रकरणांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली.
निती आयोगाचे सचिव, आरोग्य आणि सदस्य यांनी देशांमधील वाढत्या प्रकरणांसह जागतिक कोरोना परिस्थितीबाबत सर्वसमावेशक सादरीकरण केले. २२ डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या आठवड्यात सरासरी दैनंदिन प्रकरणे १५३ पर्यंत आणि साप्ताहिक संसर्गदर ०.१४ टक्क्यांपर्यंत घसरत असलेल्या प्रकरणांमध्ये भारतात सातत्याने घट होत असल्याचे पंतप्रधानांना सांगण्यात आले. तथापि, जागतिक स्तरावर दररोज सरासरी ५.९ लाख प्रकरणे नोंदवली गेली आहेत, याचीही माहिती देण्यात आली.

दक्ष राहण्याचा सल्ला…

पंतप्रधानांनी आत्मसंतुष्टतेबद्दल सावधगिरी बाळगणे आणि दक्ष राहण्याचा सल्ला दिला. त्यांनी पुनरुच्चार केला की कोरोना अद्याप संपलेला नाही आणि अधिका-यांना विशेषत: आंतरराष्ट्रीय विमानतळांवर चालू असलेल्या पाळत ठेवण्याच्या उपाययोजना मजबूत करण्याचे निर्देश दिले. सर्व स्तरांवरील संपूर्ण कोरोना पायाभूत सुविधा उपकरणे, प्रक्रिया आणि मानवी संसाधनांच्या बाबतीत उच्च पातळीवर तयार राहतील याची खात्री करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला.

ऑक्सिजन सिलिंडर, पीएसए प्लांट्स, व्हेंटिलेटर आणि मानवी संसाधनांसह रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांची परिचालन तयारी सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी राज्यांना कोरोना विशिष्ट सुविधांचे ऑडिट करण्याचा सल्ला दिला. पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना चाचण्या आणि जीनोमिक सिक्वेन्सिंगचे प्रयत्न वाढवण्याचे निर्देश दिले. राज्यांना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नियुक्त केलेल्या जीनोम सिक्वेन्सिंग लॅबोरेटरीजसोबत दररोज मोठ्या प्रमाणात नमुने सामायिक करण्यास सांगितले आहे.

कर्नाटक सरकारनेही बोलावली तातडीची बैठक….

देशातील संभाव्य चौथ्या लाटेच्या उद्रेकाच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनेदेखील कोविड-१९ प्रतिबंधात्कम तयारी केली आहे. कर्नाटकचे आरोग्यमंत्री के सुधाकर राव यांनी गुरुवारी सांगितले होते की, राज्यातील तयारीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. (Corona Updates)

हे ही वाचा :

Back to top button