नाशिक : जनावरांना मोकाट सोडून देणाऱ्या पशुपालकांवर गुन्हे, पंचवटीत कारवाई | पुढारी

नाशिक : जनावरांना मोकाट सोडून देणाऱ्या पशुपालकांवर गुन्हे, पंचवटीत कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पाळीव जनावरांना मोकाट सोडून देणाऱ्या पशुपालकांवर आता पोलिसांच्या वतीने गुन्हे दाखल केले जात आहेत. मोकाट जनावरे रस्त्यातच ठिय्या देत असल्याची समस्या अनेक वर्षांपासून आहे. मात्र, त्यावर ठोस कारवाई न झाल्याने ही समस्या सुटलेली नाही. अखेर पोलिसांनी पुढाकार घेत थेट पशुपालकांवरच गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात अनेक परिसरात रस्त्यातच बेवारस व मालकांनी सोडलेली जनावरे ठिय्या देत असतात. काही ठिकाणी ही जनावरे रस्त्त्यातच बसतात किंवा घोळक्याने उभी राहतात. अनेकदा ही जनावरे बिथरल्याने ते पळतात. त्यामुळे नागरिक, वाहनचालक भयभीत होत असल्याचेही प्रकार घडले आहेत. महापालिकेच्या वतीने गायी-म्हशींच्या मालकांना त्यासंदर्भात नोटिसा देत कारवाई करण्यात येते. तरीही शहरातील पंचवटी, सरकारवाडा, भद्रकाली, सातपूर, मुंबई नाका या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत जनावरांच्या मालकांची बेशिस्त कायम आहे. त्यामुळे पोलिस उपआयुक्तांनी कठोर भूमिका घेतली आहे. रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या जनावरांमुळे त्यांच्या व नागरिकांच्या जीविताला धोका होऊ शकतो. त्यामुळे मोकाट जनावरांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिरावाडीतील सम्राट गोकुळधाम बिल्डिंगसमोर अज्ञात मालकाने दोन गायी चराईसाठी सोडल्या होत्या. या गायींमुळे सायंकाळी 5 ला रस्त्यावर सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांच्या व जनावरांच्याही जीविताला धोका निर्माण झाला होता. त्यावरून अज्ञात मालकाविरुद्ध प्राण्यांबाबत हयगय केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस अंमलदार जयवंत जगन्नाथ लोणारे यांनी फिर्याद दिली आहे. पंचवटी पोलिस व्हिडिओ व फोटोंसह गायीच्या मालकाचा शोध घेत आहेत.

रस्त्यावर बेवारस आणि मोकाट स्वरूपात काही जनावरे दिसत आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. नागरिकांसह जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यावरून निरीक्षकांना संबंधित जनावरांच्या मालकांवर कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले आहेत.

– किरणकुमार चव्हाण, उपआयुक्त, परिमंडळ-१

हेही वाचा :

Back to top button