नाशिक : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी आज मतमाेजणी | पुढारी

नाशिक : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी आज मतमाेजणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी (दि. २०) तालुकास्तरावर मतमोजणी होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. दुपारी १२ पर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता असून, त्यानंतरच कोणता उमेदवार विजयाचा गुलाल उधळणार हे स्पष्ट होईल.

जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील १८९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. १८) शांततेत मतदान पार पडले. थेट सरपंच व सदस्य पदांसाठी झालेल्या निवडणुकीत सरासरी ८० टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे. अनेक ठिकाणी तिरंगी व चाैरंगी लढती असल्याने निवडणुकीत रंग भरले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाची रंगीत तालीम म्हणून ग्रामपंचायतींच्या निवडणुकांकडे पाहिले जात आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, माजी पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आ. सुहास कांदे आदींची प्रतिष्ठा या निवडणुकीमूळे पणाला लागली आहे.

ग्रामीण स्तरावर झालेल्या निवडणुकांमध्ये सरपंचाच्या १७७ जागांसाठी ५७७ तसेच सदस्यांच्या एक हजार २९१ जागांसाठी २,८९७ उमेदवार नशीब आजमावत आहेत. प्रत्येक उमेदवाराने प्रचारावर भर देतानाच मतदानानंतर आपल्याच विजयाचा दावा केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे लक्ष आता मतमोजणीकडे लागले आहे. मंगळवारी (दि. २०) सकाळी १० पासून त्या-त्या तालुक्याच्या तहसील कार्यालयात मतमाेजणी होणार आहे. दुपारी १२ पर्यंत सर्व ठिकाणचे निकाल लागतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे गावातील सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती जाणार, यासाठी दुपारपर्यंत ग्रामस्थांची उत्कंठा ताणून धरली जाणार आहे.

मतमाेजणीसाठी तयारी

– तालुकास्तरावर होणार मतमोजणी

– सरपंचाच्या ५७७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद

– सदस्यांसाठी २,८९७ उमेदवारांमध्ये चुरस

– दुपारी १२ पर्यंत सर्व निकाल हाती येण्याचा अंदाज

Back to top button