कोल्हापूर : सीपीआरमध्ये चक्क कागदाचा तुटवडा! | पुढारी

कोल्हापूर : सीपीआरमध्ये चक्क कागदाचा तुटवडा!

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये (सीपीआर) सध्या कागदटंचाई असल्याने रुग्णांचा रिपोर्ट चक्क त्यांच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर पाठवला जात आहे. या रुग्णालयात ग्रामीण भागातील रुग्ण प्रामुख्याने उपचार घेतात. रुग्णाच्या सोबतीला असणार्‍या व्यक्तीकडे अनेकदा स्मार्टफोन नसल्याने रुग्णाला रिपोर्ट मिळवण्यात बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागतो आहे .

सीपीआर रुग्णालयात प्रामुख्याने प्रसूती विभागात कागद संपल्याने कार्डिओग्राफ (ईसीजी) काढल्यानंतर मशिनमधील त्याचे प्रतिबिंब असलेला फोटो मोबाईलमध्ये ट्रान्स्फर करून घ्या आणि डॉक्टरांना दाखवा, असा सल्ला येथील डॉक्टर आणि कर्मचारी यांच्याकडून रुग्णांना दिला जात आहे. मागील काही दिवसांपासून या कागदांचा तुटवडा आहे.

स्मार्टफोन नसेल तर…

कार्डिओग्राफचा (ईसीजी) पेपर नसल्याने काढलेल्या ग्राफचे प्रतिबिंब बघण्यासाठी डॉक्टर मोबाईलचा वापर करत असतात. मात्र, ज्या रुग्णांकडे किंवा त्यांच्या नातेवाईकांकडे स्मार्टफोन नाहीत अशा रुग्णांनी काय करायचे, असा प्रश्न विचारला जात आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनाही स्मार्टफोन असल्यास मोबाईलवर तो रिपोर्ट अपलोड करून दिला जातो. अपलोड न झाल्यास फोटो काढण्याची सोय करून देण्यात येत आहे.

Back to top button