Burglary Nashik : घरफोड्यांमध्ये १७ लाखांचा ऐवज लंपास | पुढारी

Burglary Nashik : घरफोड्यांमध्ये १७ लाखांचा ऐवज लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी घरफोडी (Burglary Nashik) करून १७ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी शहर पोलिस चोरट्यांचा तपास करीत आहेत.

रतन पुनाजी चौधरी (४०, रा. लवाटे नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि.१८) मध्यरात्री गंगापूर रोडवरील विद्या विकास सर्कल येथील सागर स्विट्स दुकानात चोरट्याने घरफोडी (Burglary Nashik) केली. चोरट्याने दुकानाच्या वरील गॅलरीतून शिरून दरवाजाचे लॅच तोडले. दुकानातील ड्रॉव्हरमध्ये ठेवलेली १५ लाखांची राेकड चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलिस तपास करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत चोरट्याने सातपूरमधील निगळ मळा येथे १७ ते १८ डिसेंबर दरम्यान घरफोडी करून ५३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सुनील बाबुराव निगळ यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने व टीव्ही असा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसऱ्या घटनेत अनिल महेंद्र शुक्ला (३१, रा. गोरेवाडी) यांच्या घरी ७ ते १५ डिसेंबर दरम्यान घरफोडी झाली. चोरट्याने घरफोडी करून घरातील टीव्ही, चांदीचे शिक्के, चार हजार रुपयांची रोकड असा ३३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठशण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गीता उज्वल सिंग (रा. नवी मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने २१ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत देवळाली कॅम्प येथील बनाचाळ परिसरात घरफोडी केली. चोरट्याने घरफोडी करून घरातील ५१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १२ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एक लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button