‘सिल्व्हर ओक’चे दलाल सर्वांनाच ठाऊक! … अजय बोरस्ते | पुढारी

'सिल्व्हर ओक'चे दलाल सर्वांनाच ठाऊक! ... अजय बोरस्ते

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिवसेना संपुष्टात आणण्यास केवळ संजय राऊत हे कारणीभूत असून, नाशिकमध्ये ते केवळ पर्यटनासाठी येतात आणि आम्हाला दलाल म्हणण्यापेक्षा ‘सिल्व्हर ओक’चे दलाल कोण आहेत, हे सर्वांनाच ठाऊक असल्याची घणाघाती टीका, शिंदे गटात प्रवेश केलेले मनपाचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी राऊतांवर केली. आमच्या मनात कुणाबाबतही आकस नाही. मात्र, ‘अंगावर आला तर शिंगावर घेऊ’, असा इशारा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या विकासाचा शब्द दिल्यानेच आम्ही शिंदे गटात प्रवेश केल्याचे बोरस्ते यांनी सांगितले.

अजय बोरस्ते यांच्यासह ठाकरे गटाच्या नऊ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी माजी नगरसेवक हे दलाल असल्याची टीका केली. राऊतांच्या या टीकेचा बोरस्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच सिल्व्हर ओकचे दलाल कोण असा प्रश्न करत समाचार घेतला. वर्षा बंगला येथे झालेल्या प्रवेश सोहळ्यात बोरस्ते म्हणाले, नाशिक हे मुंबई, पुणे सुवर्ण त्रिकोणातील शहर आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून नाशिकचा विकास ठप्प झाला आहे. औरंगाबाद, ठाण्याच्या तुलनेत नाशिकमागे पडत आहे. एखाद्या शहराच्या विकासासाठी राजकीय इच्छाशक्ती, पाठबळ लागते ते नाशिकला मिळू शकले नाही. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर विकासाची दृष्टी बदलली असून, मुख्यमंत्री शिंदे हे नाशिकच्या विकासाकडे बारकाईने लक्ष पुरवत आहेत. नाशिकमध्ये ऑक्टोबरमध्ये झालेल्या बस अपघातावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केवळ नाशिकचा दौरा केला नाही तर अपघातग्रस्तांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. अपघातग्रस्त ठिकाणांवर तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले. नाशिकविषयी शिंदे यांच्या मनात आस्था आहे. अशा मुख्यमंत्र्यांना विरोध करून नाशिकच्या विकासाला रोखण्याचा कपाळकरंटेपणा आपल्याला मान्य नाही आणि त्यामुळेच मी आपल्या सहकाऱ्यांसोबत शिंदे गटात प्रवेश केल्याचे बोरस्ते यांनी ठामपणे सांगितले.

आपल्या मनात कुणाबद्दलही आकस नाही. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून पक्षांतर्गत कुरबुरी, टोमणेबाजी यामुळे आपण त्रासून गेलो होतो. मुख्यमंत्री शिंदे यांनी नाशिकच्या विकासाचा आराखडा तत्काळ तयार करण्याचा शब्द दिला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेल्या हिंंदुत्वाचा विचार घेऊन ते पुढे चालत आहेत. त्यामुळेच आपण बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केल्याचे बोरस्ते यांनी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button