Ashwini Vaishnaw : दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांची राज्यसभेत काँग्रेसवर टोलेबाजी | पुढारी

Ashwini Vaishnaw : दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांची राज्यसभेत काँग्रेसवर टोलेबाजी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : संसदेच्या कामकाजात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नेहमी शाब्दिक खडाजंगी बघायला मिळत असते. असेच एक वाक्युद्ध आज (दि.१६) राज्यसभेत प्रश्नोत्तर काळात बघायला मिळाले. काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी राजकीय टोलेबाजी करीत काँग्रेसचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. सभागृहात यावेळी विरोधी बाकांकडून आवाजी गोंधळ करण्यात आला.

मुळात रजनी पाटील यांनी बीएसएनएलला ४ जी का देण्यात आले नाही? ५ जी कधी देणार? असा सवाल दूरसंचार मंत्र्यांना विचारला. यावर उत्तर देताना अश्विनी वैष्णव  (Ashwini Vaishnaw) म्हणाले, ”यापूर्वीच याचे उत्तर सभागृहाला दिले आहे. कधी-कधी आत्मचिंतन केले पाहिजे. स्पेक्ट्रम देण्याची जेव्हा वेळ आली होती, तेव्हा तुमच्या पक्षाने काय निर्णय घेतला होता. हे देखील अभ्यासले पाहिजे. आम्ही तुमच्या सारखे काम करणारे लोक नाही. मोदींनी यापूर्वीच स्पष्ट सांगितले आहे की, भारतात बनवण्यात आलेले आणि देशात विकसित झालेले ४ जी, ५ जी तंत्रज्ञान बीएसएनएलमध्ये लागेल आणि जगभरात याची प्रसिद्धी होईल, असे उत्तर वैष्णव यांनी दिले.

परंतु, वैष्णव यांनी दिलेल्या उत्तरावर पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. अश्विनी वैष्णव यांच्याकडून असे उत्तर अपेक्षित नव्हते. राजकीय उत्तर देण्यापेक्षा त्यांनी यासंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट करणे अपेक्षित होते. विरोधी पक्ष म्हणून सरकारला प्रश्न विचारणे, हा आमचा अधिकार आहे. ते असे का बोलले हे माहिती नाही, अशी प्रतिक्रिया रजनी पाटील यांनी ‘दैनिक पुढारी’शी सोबत बोलताना व्यक्त केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button