

Stock Market Updates : अमेरिकेत आर्थिक मंदीची धास्ती आणि जगातील प्रमुख बँकांच्या आर्थिक धोरणाबाबतच्या अस्पष्ट भूमिकेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह आशियाई बाजारात शुक्रवारी (दि.१६) घसरण पहायला मिळाली. या कमकुवत जागतिक संकेतामुळे भारतीय शेअर बाजारातही सलग दुसऱ्या दिवशी घसरण कायम राहिली. शुक्रवारी (दि.१६) सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३०० अंकांच्या घसरणीसह ६१,४९० वर खुला झाला होता. तर निफ्टी १८,३०० वर होता. त्यानंतर ही घसरण वाढत गेली. त्यानंतर सेन्सेक्स ४६१ अंकांनी घसरून ६१,३३७ वर बंद झाला. तर निफ्टी १४५ अंकांनी खाली येऊन १८,२६९ वर बंद झाला.
हेवीवेट स्टॉक्समध्ये विक्रीचा जोर वाढला आहे. आज सेन्सेक्सच्या ३० पैकी २१ शेअर्स लाल चिन्हात होते. आजच्या टॉप गेनर्समध्ये आरआयएल, एलटी, एचयूएल, एअरटेल, ॲक्सिस बँक यांचा समावेश आहे. तर सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये (टॉप लूजर्स) टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक, विप्रो, टायटन, एचडीएफसी, कोटक बँक यांचा समावेश होता. आयटी शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा सुरूच आहे. आज निफ्टी आयटी निर्देशांक सुमारे १ टक्क्यांनी खाली आला. टीसीएस, विप्रो, इन्फोसिस, एचसीएल टेक शेअर्समध्ये १ टक्क्यांपासून ३ टक्क्यांपर्यंत घसरण झाली.
ऑइल आणि गॅस स्टॉक्सनी हिरव्या रंगात व्यवहार केला. तर आयटी स्टॉक्सची सलग दुसऱ्या दिवसी खराब कामगिरी कायम राहिली. GMM Pfaudler, पॉलिकॅब इंडिया, फोस इंडिया, येस बँक, युनियन बँक इंडिया, भारत इलेक्ट्रॉनिक्स, पीएनबी हाउसिंग फायनान्स, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स, इरकॉन इंटरनॅशनल हे शेअर्स घसरले.
विंडफॉल टॅक्समध्ये कपात केल्याच्या पार्श्वभूमीवर ओएनजीसी, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स वधारले. ओएनजीसीचा शेअर्स २ टक्क्यांने वाढला तर रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर १.५ टक्क्यांनी वधारून २,६१८.८० रुपयांवर पोहोचला. तर शुक्रवारच्या व्यवहारात UCO बँकेच्या शेअर्समध्ये सुमारे ७ टक्क्यांनी वाढ झाली. या शेअर्समध्ये सलग दहाव्या सत्रात वाढ कायम राहिली आहे. हा शेअर्सने ७.३१ टक्क्यांने वधारून ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. हा शेअर ३८.१५ रुपयांवर पोहोचला आहे. याआधी हा शेअर ३५.५५ रुपयांवर जाऊन बंद झाला होता.
UCO बँकेसह, इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) ने देखील आज सार्वजनिक क्षेत्राच्या बँक शेअर्समधील कमकुवतपणा झुगारून ३८.१५ रुपयांची एक वर्षातील उच्चांकी पातळी गाठली. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक अलीकडील उच्चांकावरून खाली आला. तो १.९३ टक्क्यांनी घसरला.
GMM Pfaudler चे शेअर्स शुक्रवारी तब्बल १८ टक्क्यांनी घसरले. ५ वर्षातील या शेअर्सची सर्वात खराब कामगिरी आहे. एका अहवालात असे म्हटले आहे की, या कंपनीचा एक प्रमोटर्स त्याचा बहुतांश हिस्सा विकणार आहे. Pfaudler Inc ची GMM Pfaudler मध्ये ३१.९ टक्के हिस्सेदारी आहे.
दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DFPCL) च्या शेअर्सने त्याच्या संयुक्त व्यवसायांचे विलगीकरण जाहीर केल्यानंतर शुक्रवारच्या व्यवहारात सुमारे ६ टक्क्यांनी उसळी घेतली. बीएसईवर मागील ८१२.४० रुपयांच्या बंदच्या तुलनेत हा शेअर्स ५.९८ टक्क्यांनी वाढून ८६१ रुपयांवर पोहोचला. त्यांच्या एकूण १.१० लाख शेअर्सची आज विक्री झाली. याची उलाढाल ९.३० कोटी रुपये झाली. कंपनीचे बाजार भांडवल म्हणजे एम-कॅप १०,७६६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
बँक निफ्टी निर्देशांक ०.६ टक्क्यांनी खाली येऊन ४३,२१३ वर आला. या आठवड्यात या निर्देशांकाने ४४ हजारांचा टप्पा पार करत उच्चांक गाठला होता.
अमेरिकेचा किरकोळ विक्री डेटा आणि मध्यवर्ती बँकेच्या व्याजदर वाढीचा निर्णय जागतिक मंदीसाठी कारण ठरेल या शक्यतेने अमेरिकेतील प्रमुख निर्देशांकांत घसरण वाढली आहे. याचे पडसाद आशियाई शेअर बाजारात दिसून येत आहेत. (Stock Market Today) सिंगापूर एक्स्चेंजवरील निफ्टी फ्यूचर्स ६४ अंकांनी घसरून १८,३९५ वर आला. तर टोकियोचे शेअर्स घसरणीसह खुले झाले होते. निक्केई निर्देशांक १.३४ टक्के म्हणजे ३७६.५८ अंकांनी घसरून २७,६७५ वर, तर टॉपिक्स निर्देशांक ०.९८ टक्क्यांनी घसरून १,९५४ वर आला. (Stock Market Updates)
हे ही वाचा :