नाशिक : परतीच्या पावसाने डोळ्यात आलेले पाणी पुसून कांदा लागवडीसाठी बळीराजाची पुन्हा धडपड | पुढारी

नाशिक : परतीच्या पावसाने डोळ्यात आलेले पाणी पुसून कांदा लागवडीसाठी बळीराजाची पुन्हा धडपड

नाशिक (पालखेड मिरचीचे) : पुढारी वृत्तसेवा
निफाड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाळ व लाल कांदा लागवडी वेगात सुरू आहे. उत्पादक शेतकर्‍यांकडून वीज, पाणी, कांदा रोप व महिला मजूर या सर्वांची सांगड घालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

दर्जेदार कांद्यासाठी नाव असलेल्या निफाड तालुक्यातील उत्तरपूर्व पट्ट्यात कांद्यांच्या लागवडीच्या क्षेत्रात यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सलग तीन वर्षे बाजारभावाच्या मंदीमुळे व उत्पादन खर्चात वाढ होऊनही उत्पादक आशेपोटी पुन्हा यावर्षीही मोठ्या जोमाने कामाला लागला आहे. पहिल्या टप्प्यात परतीच्या पावसामुळे काही भागांतील कांदा रोपे वाया गेली. मात्र, दुसर्‍या टप्प्यात कांदा रोपे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. तालुक्यातील कांदा उत्पादकांना समाधानकारक बाजारभाव मिळावा यासाठी शेतकरीवर्ग कांदा चाळीत साठवणूक करतो. मात्र, यावर्षी साठवणूक केलेला कांदा मोठ्या प्रमाणात चाळीतच सडल्यामुळे तसेच बाजारभाव एकदम वाढून कमी झाल्यामुळे उत्पादकांना साठवणूक केलेल्या कांद्याचे योग्य दाम मिळवता आलेले नाही. कुंभारीचे कांदा उत्पादक शेतकरी सुनील जाधव म्हणाले की, यावर्षी परतीच्या पावसाने कांदा रोप वाया गेली. त्यामुळे परत कांदा रोपे टाकावी लागली. पहिल्या टप्प्यात कांदा रोपांची 40 टक्केसुद्धा लागवड झालेली नाही. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात परत कांदा रोपे टाकली असून, रोपे चांगल्या प्रतीची आली आहेत. यावर्षी कांदा बी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने कांदा बियांचे बाजारभाव शेतकर्‍यांच्या आवाक्यात आहेत, पण मागील वर्षी दुसर्‍या टप्प्यात कांदा बी उत्पादकांनी शेतकर्‍यांची मोठी लूट केली होती.

कांदा बी पेरून खर्चावर मात
गोदाकाठ परिसरातील शेतकरी मच्छिंद्र अडसरे यांनी उसात आंतरपीक म्हणून कांदा लागवड करून उत्पादन खर्च कमी केला आहे. कांद्याचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून आपल्या शेतात ते यशस्वी प्रयोग करत आहेत. कांदा बी पेरून आलेल्या कांद्यांना खर्च कमी आहे. या पद्धतीत कांदा पीक घेतल्यास उत्पादकांना निश्चितच फायदा होईल, असे यावेळी त्यांनी सांगितले.

60 टक्के लागवड
निफाड तालुक्यातील उत्तरपूर्व पट्ट्यात एकूण क्षेत्रांपैकी 60 टक्के कांदा लागवड झालेली आहे.

हेही वाचा:

Back to top button