आंबेगावला कांदा लागवडी वेगात सुरू; चांगल्या बाजारभावाची अपेक्षा | पुढारी

आंबेगावला कांदा लागवडी वेगात सुरू; चांगल्या बाजारभावाची अपेक्षा

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : गतवर्षीच्या उन्हाळी कांद्यांना बाजारभावाची साथ मिळालीच नाही, तसेच अतिपावसाचा देखील कांद्यांना फटका बसून नुकसान झाले. अद्यापही शेतकर्‍यांच्या बराकींमध्ये कांदे मोठ्या प्रमाणात शिल्लक असताना देखील आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात कांदा लागवडी जोरात सुरू झाल्या आहेत. यंदा तरी कांद्यांना बाजारभाव चांगला मिळेल, अशी शेतकर्‍यांना आशा आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात दरवर्षी उन्हाळी हंगामात कांदा लागवडी मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात.

गतवर्षीच्या हंगामातील कांद्यांना अतिपावसाचा फटका बसला. अनेक शेतकर्‍यांच्या बराकींमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे बराकीत साठवलेले कांदे निम्म्याहून अधिक सडून गेले. दिवाळी सणाच्या वेळी या कांद्यांना बाजारभाव चांगला मिळाला. परंतु त्याचा फायदा कमी शेतकर्‍यांना मिळाला. त्यानंतर बाजारभावात मोठी घसरण होत गेली. बाजारभावातील घसरण आणि कांदा सडण्याचे प्रमाण अधिक यामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले.

सध्या पारगाव, काठापूर, शिंगवे, वळती, नागापूर, थोरांदळे आदी गावांमध्ये कांदा लागवडीबरोबरच गतवर्षीच्या कांद्यांची प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवण्याची कामे एकाच वेळी सुरू आहेत. यंदा बहुतांशी शेतकर्‍यांनी घरगुती पद्धतीने कांदा रोपे तयार केली आहेत. कांदा लागवडी मोठ्या प्रमाणावर होतील, असे चित्र आहे. बाजारभावाची देखील साथ मिळेल, अशी आशा शेतकर्‍यांना आहे.

Back to top button