नाशिक : ‘त्या’ नराधामाच्या घरातून द्रोण बनविण्याचे साहित्य जप्त | पुढारी

नाशिक : 'त्या' नराधामाच्या घरातून द्रोण बनविण्याचे साहित्य जप्त

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

पंचवटी परिसरातील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमात सात मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या संशयित हर्षल माेरेवर वेठबिगारी व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपासाकामी त्याच्या द्रोण बनविणाऱ्या घराचा पंचनामा करत पोलिसांनी काही साहित्य जप्त केले आहे. तत्पूर्वी, पोलिसांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून संबंधित घर सील असल्याने त्यासाठी रितसर परवानगी मिळविली .

द किंग फाऊंडेशन संचलित ज्ञानपीठ गुरुकुल वसतिगृहात माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य समोर आले होते. यात वसतिगृहाचा संचालक हर्षल ऊर्फ सोनू मोरे याने तब्बल सात मुलींवर अत्याचार केल्याचे समोर आल्याने त्याच्यावर एकापाठोपाठ सात गुन्हे दाखल झाले. त्यापाठोपाठ आता संशयित हर्षल मोरे याने वसतिगृहातील मुले शाळेतून आल्यानंतर त्यांच्याकडून तो द्रोण तयार करून घेत असत. तसेच, मुलांना बालकामगार म्हणून राबवूनही त्यांना कामाचा माेबदलाही देत नसल्याचे पोलिस तपासात समोर आले. संशयित मोरे हा मुलांकडून वेठबिगारी करवून घेत असल्याने बालसुरक्षा कायदा अंतर्गत मुलांची काळजी व संरक्षण यानुसार वेठबिगारी आणि अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये ॲट्रॉसिटीचा गुन्हा आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोरे याने गेल्याच वर्षी द्रोण बनविण्याचे मशीन घेतले होते. हे मशीन त्याने जत्रा हॉटेल, वृंदावननगर येथील प्रगती सोसायटीतील घरात ठेवले होते. परंतु या घराला धर्मादाय आयुक्त यांनी यापूर्वीच सील केलेले असल्याने सदरच्या घराचा पंचनामा करता आलेला नव्हता. पंचनाम्यासाठी घराचे सील काढून मिळावे, अशी विनंती आडगाव पोलिसांनी धर्मादाय आयुक्तांना केली होती. पोलिसांच्या विनंतीनुसार धर्मादाय आयुक्त यांनी दोन पंचांची नियुक्ती करून त्यांच्या देखरेखीखाली घराचा पंचनामा करून दिला. द्रोण बनविण्याचे काही साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले व घर पुन्हा धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली सील करण्यात आले असून, गुन्ह्यांच्या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे.

गुन्ह्यांची संख्या वाढणार?
पंचवटीतील काही स्वीटच्या दुकानांवर व द्रोण विक्रेते व्यावसायिकांना या अल्पवयीन मुलांमार्फत द्रोण विकले जात होते. याबाबत सुरगाणा येथील १६ वर्षीय मुलाने फिर्याद दिल्याप्रमाणे मोरेवर वेठबिगारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता आधार आश्रमातील उर्वरित मुलांचीही लवकरच एकत्रित चौकशी करण्यात येणार आहे व त्यातून काही पुढे आल्यास मोरेवर आणखी गुन्हे दाखल होऊ शकतात व गुन्ह्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

Back to top button