कृषिमंत्री अब्दुल सत्तार : आधुनिक शेतीमुळे शेतकर्‍यांच्या जीवनात आमूलाग्र बदल | पुढारी

कृषिमंत्री अब्दुल सत्तार : आधुनिक शेतीमुळे शेतकर्‍यांच्या जीवनात आमूलाग्र बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानावर आधारित प्रायोगिक शेतीमुळे शेतकर्‍यांच्या जीवनात निश्चितच आमूलाग्र बदल घडतो आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. नाशिक येथील डोंगरे वसतिगृह येथे आयोजित कृषी महोत्सवाच्या भेटीदरम्यान शनिवारी (दि. 10) ते बोलत होते.

यावेळी कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, जिल्हा कृषी अधिकारी रमेश शिंदे, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) वंदना शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, राकेश वाणी, संजय सूर्यवंशी यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ना. सत्तार म्हणाले, शेतकरी हा आपल्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नानाविध प्रकारची पिके घेत आहे. नवीन प्रकारच्या कृषी वाणांची निर्मितीही होत आहे. या आधुनिक शेतीला निश्चितच चालना मिळाली पाहिजे. शेतकर्‍यांच्या शेतमालास योग्य भाव, माल साठवणुकीस शीतगृह, शेतीमालाचे पॅकिंग, प्रक्रिया उद्योग, निर्यातीकरण या सर्वच बाबींच्या अभ्यासासाठी समिती स्थापन केली असून, समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासनस्तरावर याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती ना. अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा कृषी महोत्सवातील कृषी विभाग, वन विभाग, शेतकी कंपन्या, प्रक्रिया उद्योग, शेती माल, भाजीपाला, खते, शेती औजारे, औषधे, बी-बियाणे, खाद्य पदार्थ, शेती उत्पादने अशा विविध 200 हून अधिक स्टॉल्सना भेट देऊन त्यांनी स्टॉलधारकांशी संवाद साधला. तसेच औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड येथे आयोजित 01 ते 05 जानेवारी 2023 या कालावधीत होणार्‍या राज्यस्तरीय कृषी महोत्सवास उपस्थित राहण्याचे निमंत्रण त्यांनी स्टॉलधारकांना दिले.

हेही वाचा:

Back to top button