ड्रग्ज खरेदीसाठी डार्क वेबचा वापर; ‘काय आहे डार्क वेब ? | पुढारी

ड्रग्ज खरेदीसाठी डार्क वेबचा वापर; 'काय आहे डार्क वेब ?

ठाणे;  नरेंद्र राठोड :  ड्रग्ज माफियांवर पोलिसांनी व नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने कारवाई तीव्र केल्यामुळे मुंबई-ठाणे परिसरातील ड्रग्जचा बाजार बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आला आहे. ड्रग्जच्या बाजारावर तपास यंत्रणांनी करडी नजर रोवल्याने यातून मार्ग काढण्यासाठी नशेडींनी आपली तलफ भागवण्यासाठी अनेक पर्यायी पदार्थांचा वापर सुरू केला आहे. तर ड्रग्ज माफियांनी देखील ऑफलाईन मार्केटमध्ये रिस्क वाढल्याने ऑनलाइन ड्रग्ज स्मगलिंगचा पर्याय शोधून काढला आहे. त्यासाठी डार्क वेब अथवा डार्क नेट नामक इंटरनेटच्या गुप्त दुनियेचा वापर केला जातोय.

डार्क वेबच्या माध्यमातून अनेक देशातून भारतात ड्रग्ज स्मगलिंग केली जातेय. सध्या विदेशातून भारतातल्या मुंबईसह सर्वच प्रमुख शहरांमध्ये पोहचणाऱ्या ८० टक्के ड्रग्ज कन्साइन्मेंट याच डार्क वेबच्या माध्यमातून ऑर्डर केल्या जातात. डार्क वेबच्या माध्यमातून होणाऱ्या या स्मगलिंगच्या धंद्यात बिटकॉईन व क्रिप्टो करेंसीने आर्थिक व्यवहार केला जातोय.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने नुकतेच मुंबई व दिल्ली येथून पकडलेल्या कोकेन व हिरॉईन ड्रग्ज प्रकरणात डार्क वेबचे कनेक्शन समोर आले आहेत. मुंबई, दिल्ली, कलकत्ता, बंगळुरू या बड्या शहरांसह अनेक ठिकाणी पोहचवण्यात येणारे घातक ड्रग्ज डार्क वेबच्या माध्यमातून विदेशातून भारतात मागवले जातात. त्यानंतर या ड्रग्ज कन्साइन्मेंटला समुद्रमार्गे विविध शहरात पोहचवले जाते अशी बाब तपास यंत्रणांच्या चौकशीतून पुढे आली आहे. डार्क वेबचे लोण बड़े ड्रग्ज माफियांपर्यंतच शिल्लक राहिलेले नाही, तर अनेक नशेडी व छोटेमोठे तस्कर देखील डार्क वेबच्या माध्यमातून ड्रग्ज कन्साइन्मेंट ऑनलाइन ऑर्डर करीत असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे.

काही महिन्यांपूर्वी ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने कल्याण- डोंबिवलीतल्या तिघा ड्रग पेडलरकडून पेपर बॉम्ब अर्थात एलएसडी पेपर हे डिझायनर ड्रग्स पकडल्याने एकच खळबळ उडाली होती. या कारवाईत तब्बल १ हजार ४६६ एलएसडी पेपर जप्त करण्यात आले होते. त्यांची किंमत तब्बल १ कोटी २ लाख ६२ हजार रुपये इतकी आहे. या गुन्ह्यात अटक केलेल्या तिघा तरुणांनी हे ड्रग्ज डार्क वेबच्या माध्यमातून ऑनलाइन मागवल्याचे समोर आले आहे. या घटनेतून ड्रग्ज माफिया आपला व्यवसाय ऑनलाइन करण्यासाठी डार्क वेबचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नेमके हे डार्क वेब आहे तरी काय? असा प्रश्न अनेकांसमोर उपस्थित झाला आहे.

डार्क वेब म्हणजे इंटरनेटवरील तस्करी जगताचे स्वतःचे छुपे ब्राऊजर आहे. येथे घातक हत्यार, लोकांचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड डिटेल्स, ई-मेल, लोकांचे फोन नंबर, ड्रग्स, नकली करन्सी इतर वस्तू सहज मिळतात. या सर्व गोष्टी येथे खूप कमी दरात मिळतात. आपण ज्या इंटरनेटचा वापर करतो, ते खूप छोटे आहे. इंटरनेटच्या मोठ्या भागापर्यंत लोक पोहचली नाहीत. त्यालाच डार्क वेब म्हणतात, इंटरनेटची ही दुनिया लोकांसाठी अदृश्य आहे. येथे युजर्सची ओळख गुप्त राखली जाते. हॅकर्ससाठी डार्क वेब हा मोठा अड्डा आहे. येथे करोडो लोकांची पर्सनल माहिती डार्क वेबमध्ये फक्त तीन हजार पाचशे रुपयांत मिळते. यामध्ये आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सचा पासवर्ड, बँक डिटेल्स आणि क्रेडिट कार्ड संबंधित माहितींचा समावेश असतो. डार्क वेबच्या माध्यमातून ड्रग्स आणि घातक हत्यार सर्रास विक्री होतात. दरम्यान, भारतात ड्रग्ज माफियांवर पोलिस, नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो व इतर तपास यंत्रणांनी करडी नजर रोवल्याने आता हे ड्रग्ज माफिया डार्क वेबच्या माध्यमातून ड्रग्ज स्मगलिंग करत आहेत. सध्या भारतात पोहचणारे ८० टक्के कोकेन, हेरॉईन, एलएसडी, एमडी असे विदेशी ड्रग्ज डार्क वेबच्या माध्यमातून ऑर्डर केले जातात अशी माहिती ठाणे गुन्हे शाखेने दिली.

पकडणे मुश्किल

डार्क वेब वापरणाऱ्यांना पकडणे जवळपास अशक्य असते. त्यास कारण म्हणजे डार्क वेबसाठी वापरण्यात येणारे टॉर हे ब्राउझर, टॉर ब्राउझरवर वापरकर्त्याचा आयपी ऍड्रेस नेहमी बदलत असतो. तर येथे सुरक्षेसाठी ओनियन राऊटिंग ही यंत्रणा असते. त्यातून डार्क वेब वापरणाऱ्याचा आयपी ड्रेस कोणालाही समजत नाही. येथे होस्ट आणि युझर यांची देखील माहिती मिळत नसल्याने येथे सर्रास बेकायदा वस्तू खरेदी- विक्री केल्या जातात.

‘काय आहे डार्क वेब ?

अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणांनी जगभरातील महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी व त्याच्या आदानप्रदानासाठी डार्क वेब नावाच्या गुप्त इंटरनेट जगाचा वापर सर्व प्रथम नव्वदच्या दशकात सुरू केला. या डार्क वेबचा वापर ड्रग्ज व घातक हत्यार स्मगलिंग, हॅकिंग, ह्यूमन ट्रैफिकिंग व इतर बेकायदेशीर कामांसाठी होऊ लागला. डार्क वेब हा एक इंटरनेटचा एक प्रकार आहे. मात्र, येथे कुणालाही प्रवेश करणे सहजासहजी शक्य होत नाही. इंटरनेटच्या या गुप्त जगाला डार्क वेब म्हणतात.

डार्क वेबवर सहजासहजी कोणालाही प्रवेश करता येत नाही यासाठी एका विशिष्ट ब्राऊझरची गरज लागते. त्याला टॉर ब्राऊजर म्हणतात. टॉर ब्राउझरच्या सुर- क्षेसाठी ओनियन राऊटिंग ही यंत्रणा असते. त्यातून डार्क वेब वापरणाऱ्याचा आयपी ड्रेस कोणालाही समजत नाही. डार्क वेब वरील सर्व वेबसाइटचे स्वतंत्र डोमेन नेम असते.

Back to top button