

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या शरद कृषी महोत्सवाचे उद्घाटन तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. या वेळी शनिवार (दि. 10) विरोधी पक्षनेते अजित पवार शरद कृषी महोत्सवाला भेट देणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितले. शरद कृषी महोत्सवाचा शेतकर्यांनी लाभ घेण्याचे आवाहन कोकाटे यांनी केले.
इंदापूर शहरात नवीन नगरपालिकेच्या शेजारच्या मैदानात आठ ते बारा डिसेंबरदरम्यान शरद कृषी महोत्सव आयोजित केला आहे. या प्रदर्शनामध्ये अनेक प्रकारचे नवीन उपक्रम, शेतीमध्ये झालेली सुधारणा, त्यामध्ये मिळालेले उत्पन्न, अशा अनेक बाबी शेतकर्यांच्या माहितीसाठी उपलब्ध राहणार आहेत. त्याचप्रमाणे जे स्वतः चांगल्या प्रकारची शेती करतात, त्यांचे शेतकर्यांना मार्गदर्शन राहणार आहे.
शेती क्षेत्रातील शास्त्रज्ञदेखील मार्गदर्शन करणार आहेत. आपण नऊ डिसेंबरला महिलांचा मेळावा घेतलेला आहे. दहा तारखेला युवक महोत्सव घेतला आहे. या वेळी जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य सचिन सपकळ, अमोल भिसे, तात्यासाहेब वडापुरे, विठ्ठल ननवरे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, बाळासाहेब करगळ, छाया पडसळकर, रेहाना मुलाणी, शिवाजी तरंगे, संजय दोशी संजय रूपनवर,श्रीधर बाब्रस आदी उपस्थित होते.