आशा भोसलेंना ‘महाराष्ट्र भूषण’; नागपुरात रंगणार स्वरांची मैफल | पुढारी

आशा भोसलेंना 'महाराष्ट्र भूषण'; नागपुरात रंगणार स्वरांची मैफल

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारचा सर्वोच्च सन्मान असलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार लवकरच प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांना नागपुरात दिला जाणार आहे. या संदर्भात स्वतः आशा भोसले यांनी संमती दिल्याची माहिती वन, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

गेली दोन वर्षे कोरोना संकटामुळे महाराष्ट्र भूषण व इतर सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करण्यात आलेले नाहीत. हे सर्व पुरस्कार एकाच वेळी प्रदान करण्याची सांस्कृतिक मंत्रालयाची योजना आहे. हिवाळी अधिवेशन काळात संपूर्ण सरकार, राज्यातील आमदार शहरात येतात. याचवेळी हा कार्यक्रम आयोजित करण्याचा मुनगंटीवार यांचा मानस आहे. यासाठी खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे कार्यक्रम स्थळ ईश्वर देशमुख कॉलेज विचाराधीन आहे. हा कार्यक्रम भव्य दिव्य होण्याच्या दृष्टीने हे स्थळ उपयुक्त ठरणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. आशाताई त्यांच्या सत्काराच्या निमित्ताने ‘आवाज चांदण्याचे’ ही संगीत रजनी देखील होणार असून, त्याची तयारी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या काळात २०२० मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी आशा भोसले यांच्या नावाची घोषणा झाली. आता शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आल्यानंतर कार्यक्रमांना वेग आला आहे. विविध उद्घाटन जोरात आहे.

युती सरकारच्या पहिल्या कार्यकाळात गानकोकिळा लता मंगेशकर व क्रिकेटमधील सुनील गावस्कर यांना नागपूरच्या विधानभवनाच्या हिरवळीवर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. पहिल्यांदाच हा सोहळा मुंबई बाहेर झाला होता. आता तब्बल २३ वर्षानंतर पुन्हा हा सोहळा नागपुरात होऊ घातला आहे. अर्थातच यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरला. लतादीदींनी महाराष्ट्र भूषणच्या वेळी ‘मोगरा फुलला’ हे गीत सादर करीत नागपूरकरांवर माझा कुठलाच राग नाही. नागपूर विदर्भाने आमच्या कुटुंबीयांवर सतत प्रेमच केल्याची भावना व्यक्त केली होती. आता आशाताई नागपुरातील या कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना कुठले गाणे गातात याविषयी नागपूरकरांना उत्सुकता असणार आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button