नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
सकल हिंदू समाजाच्या वतीने सिन्नर शहरातून हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हिंदू आक्रोश मोर्चात शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांसह विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते. 'वंदे मातरम, भारत माता की जय, जय श्रीराम' आदींसह विविध घोषणांनी सिन्नर शहरातील रस्ते दुमदुमून गेले होते.
हिंदू आक्रोश मोर्चात शहराच्या ग्रामीण भागातील नागरिकांसह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. सिन्नर बसस्थानकापासून हिंदू आक्रोश मोर्चात विविध घोषणा देत शेकडो नागरिक सहभागी झाले. बसस्थानक, सरस्वती पूल, गणेश पेठ, शिवाजी चौक या मार्गे मोर्चा विविध घोषणा देत तहसील कार्यालयाच्या व पोलिस ठाण्याच्या प्रांगणात पोहोचला. प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार एकनाथ बंगाळे, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात हिंदू धर्माच्या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. नाशिक येथील निशा पाटील यांनी 'लव्ह जिहाद'बाबत माहिती देताना या फंदात न पडण्याचे आवाहन तरुणींना केले. या लक्षवेधी मोर्चात बहुतांश नागरिक डोक्यावर भगवी टोपी व भगवे झेंडे हातात घेऊन सहभागी झाले. पोलिस निरीक्षक मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
'त्यांच्या' फसव्या प्रेमाच्या जाळ्यात अडकू नका : आव्हाड
सध्या देशामध्ये लव्ह जिहादचे हजारो प्रकरणे उघडकीस येत आहेत. हिंदू धर्मातील हजारो मुलींना जाणीवपूर्वक मुसलमान धर्मातील तरुणांकडून प्रेमाच्या जाळ्यात अडकवले जात असल्याचा आरोप भाजपचे तालुका प्रभारी जयंत आव्हाड यांनी केला. यापैकी शेकडो मुलींची हत्यासुद्धा झाल्या. असाच दुर्दैवी प्रकार श्रद्धा वालकर या हिंदू भगिनीच्या बाबतीत घडला. त्यामुळे मुस्लिम तरुणांच्या फसव्या प्रेमाच्या जाळ्यात अडकू नका, असे आवाहनही आव्हाड यांनी हिंदू तरुणींना केले.
लव्ह जिहाद, धर्मांतरण बंदी कायदा लागू करावा
श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आफताबला लवकरात लवकर फासावर लटकावे. त्याचबरोबर लव्ह जिहाद आणि धर्मांतरण बंदी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा, जोपर्यंत हे कायदे लागू होत नाही, तोपर्यंत सातत्याने आंदोलने आणि मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा देण्यात आला.