आताच तुरुगांबाहेर आल्याचे भान ठेवा, शंभूराज देसाईंचा संजय राऊतांना इशारा | पुढारी

आताच तुरुगांबाहेर आल्याचे भान ठेवा, शंभूराज देसाईंचा संजय राऊतांना इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कर्नाटक-महाराष्‍ट्र सीमाप्रश्नावरून महाराष्‍ट्रात वातावरण चांगलेच तापले आहे. त्‍यातच आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत, शिंदे-फडणवीस सरकारवर कडाटून टीकास्‍त्र सोडले. स्वाभिमानी म्हणून शिवसेना सोडली असे बोलणारे आज तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. हा षंढपणा आहे.” असं खोचक ट्विट त्‍यांनी केलं होतं. त्‍यावर शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी कडाडून पलटवार केला. संजय राऊत यांना सीमाप्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही. राऊत यांनी अशी वादग्रस्‍त वक्‍तव्ये थांबवावीत अन्यथा आम्‍ही त्‍यांना जशाच तसे उत्‍तर देऊ असा पलटवार केला.

आताच कुठे तुम्ही साडेतीन महिने आराम करुन तुरुगांबाहेर आलात. तुम्ही तुरुंगाबाहेर येताच बाहेरचं वातावरण तुम्हाला मानवणार नाही असं वाटत आहे. तुम्हाला पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये, अशा शब्दांत शंभूराज देसाई यांनी राऊत यांना इशारा दिला आहे.

सीमाप्रश्नावर केंद्रान लक्ष घालावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रयत्‍नशील आहेत. गेल्‍या सहा महिन्यात शिंदे-फडणवीस सरकारने सीमाप्रश्नावर जितके काम केले तितके गेल्‍या अडीच वर्षात ठाकरे सरकारने केले आहे का? असा प्रश्न देखील त्‍यांनी राऊत यांना केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात वक्‍तव्ये केल्‍यास आम्‍ही दोन हात करायला तयार आहोत असे आव्हान दिले.

यावेळी बोलताना शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्‍वापेक्षा शरद पवार हे मोठे वाटतात का? असा प्रश्न केला. संजय राऊत हे आमच्या आमदारांमुळे खासदार झाले आहेत. नाहीतर ते माजी खासदार झाले असते. त्‍यामुळे यापुढे त्‍यांनी अशी वादग्रस्‍त विधाने करताना सांभाळून बोलावे अन्यथा आम्‍हीही जशाच तसे उत्‍तर देऊ असे सांगितले.

हेही वाचा ;  

Back to top button