धुळे : पुढारी वृत्तसेवा
धुळे तालुक्यातील कावठी शिवारात बनावट मद्याचा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील आणि तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने उद्ध्वस्त केला आहे. प्रवरानगर येथील नामांकित कंपनीच्या ब्रँडचा वापर करून ही बनावट दारू तयार केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकाराची पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी घटनास्थळावरूनच राज्याचे मंत्री विखे पाटील यांना माहिती दिली असून हा प्रश्न विधिमंडळात मांडला जाणार असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान या प्रकरणात सात जणांना अटक केली असून तीनजण फरार आहेत. तर घटनास्थळावरून 95 लाख 77 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी फागणे ते बाबुळवाडी रस्त्यावर एम एच 41 ए यु 21 24 क्रमांकाची ट्रक ताब्यात घेतली. या ट्रकची तपासणी केली असता या ट्रकमध्ये सोपान रवींद्र परदेशी हा युवक आढळून आला. त्याच्या चौकशीमध्ये या ट्रकमध्ये बनावट मद्याचे 100 बॉक्स आढळून आले. त्यानुसार प्राथमिक चौकशीच्या आधारावर मेहरगाव परिसरातील कावठी शिवारात पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे आणि सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सागर काळे व महादेव गुट्टे, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, मुकेश पवार, अविनाश दहिवड, नितीन दिवसे, अमोल कापसे, दीपक पाटील, नंदू चव्हाण, वसंत वाघ या कर्मचाऱ्यांच्या मदतीने ओम साई फार्म हाऊस या शेडवर छापा टाकण्यात आला. या छाप्यामध्ये भयानक प्रकार समोर आला. या शेडमध्ये बनावट मद्य पॅकिंग करण्यासाठी अत्याधुनिक मशीन बसवल्याची बाब निदर्शनास आली. घटनास्थळावरून पोलीस पथकाने सोपान रवींद्र परदेशी, शांतीलाल उत्तम मराठे, सागर बापू भोई, सुनील सुधाकर देवरे, ज्ञानेश्वर बाबूसिंग राजपूत, सचिन सुधाकर देवरे, नितीन रंगनाथ लोहार, तसेच सोपान परदेशी या सात जणांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली.
हा मुद्देमाल जप्त
घटनास्थळावरून पोलिसांनी तीन लाख 50 हजार रुपये किमतीची देशी दारू, 16 लाख 50 हजार रुपये किमतीचे रसायन, एक लाख रुपये किमतीचे बाटलीचे बुच, चार लाख 90 हजार रुपये किमतीच्या रिकाम्या बाटल्या, एक लाख 29 हजार रुपये किमतीचे बनावट देशी दारूचे 37 बॉक्स, 14,800 रुपये किमतीची बनावट दारू, अकरा लाख रुपये किमतीची विना क्रमांकाची स्कार्पिओ गाडी, बनावट मद्य तयार करणारे 25 लाखाचे मशीन, सहा लाखाचे वॉटर फिल्टर, 70 हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकल, दोन लाख रुपये किमतीचे जनरेटर, अडीच लाख रुपये किमतीचे आठ मोबाईल फोन यासह इतर सर्व साहित्य असे एकुण 95 लाख 77 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीस पथकाने जप्त केला आहे.
आरोपींना बनावट मद्य तयार करण्याची पार्श्वभूमी
या संदर्भात पोलीस अधीक्षक संजय बारकुंड तसेच अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी या गुन्ह्याची सविस्तर माहिती दिली. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी कावठी गावात राहणारा गुलाब शिंदे तसेच शिरूड येथील दिनेश गायकवाड आणि राहुल अहिरराव उर्फ राहुल मास्तर हे असून हे तिघेही फरार आहेत. यापूर्वी गुलाब शिंदे यांच्यावर बनावट दारू तयार करण्याचे सहा गुन्हे दाखल असून चार गुन्हे गुजरात राज्यात दाखल आहेत. गुजरात मधील एका गुन्ह्यात सुमारे वर्षभरापासून गुलाब शिंदे हा फरार होता. त्याला दोन महिन्यापूर्वीच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेऊन गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले होते. तसेच दिनू डॉन उर्फ दिनेश गायकवाड याच्यावर देखील बनावट मद्याची तस्करी करण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अटक केलेल्या नऊ पैकी पाच आरोपी हे धुळे तालुक्यातील शिरूड येथील रहिवासी असून एक आरोपी साक्री तर एक आरोपी शिरपूर येथील रहिवासी आहे. तर मुख्य आरोपी असणारा गुलाब शिंदे हा कावठी गावातीलच असून त्याच्या घरात राजकीय पार्श्वभूमी असल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे.
प्रवरानगर ब्रँडची बनावट नक्कल
बनावट मद्य तयार करणाऱ्या गुलाब शिंदे, दिनेश गायकवाड आणि राहुल मास्तर या तिघांनी प्रवरानगर येथील नामांकित असणाऱ्या एका कंपनीच्या देशी दारूच्या ब्रँडचा वापर केला. या ब्रँडचे स्टिकर, बॉक्स, तसेच बाटल्या आणि बुच हे देखील बनावट तयार करून घेतले. ही बाब निदर्शनास आल्याने पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी घटनास्थळावरूनच राज्याचे मंत्री विखे पाटील यांना या ब्रँडचा गैरवापर झाल्याची माहिती दिली. त्यानुसार मंत्री पाटील यांनी या प्रकरणात नामांकित ब्रँडचा गैरवापर करून बनावट मद्यासाठी वापर केल्या प्रकरणात वेगळा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित करणार असल्याची बाब देखील मंत्री पाटील यांनी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांना सांगितली.
बनावट मद्याचे विदर्भ कनेक्शन
बनावट मद्याच्या कारखान्याच्या ठिकाणावरून अटक केलेल्या ऑपरेटरची प्राथमिक चौकशी केली असता त्याने हा कारखाना काही दिवसांपूर्वीच कार्यान्वित झाल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे हे बनावट मद्य विदर्भामधील विविध गावांमध्ये पाठवले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे बनावट मद्य हे गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वापरले जाण्याची शक्यता देखील असल्याची माहिती पोलीस तपासून पहात आहेत.
घटनास्थळावरच तपास पथकाला बक्षीस
या धडाकेबाज कारवाईनंतर पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाला दहा हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. घटनास्थळावरच अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप महिराळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे आणि त्यांच्या पथकाला हा रोख पुरस्कार देण्यात आला.