

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
शासकीय पोषण आहार योजनेचे लाखोंचे धान्य काळ्याबाजारात विक्री करण्याच्या प्रयत्नातील टोळीच्या मालेगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांना दिला जाणार्या शिधा कीटचा सुमारे 24 लाख 43 हजार 935 रुपयांचा हा साठा असून, याप्रकरणी दोघांना अटक झाली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, कोण-कोणत्या शाळेतून हा शिधा काळाबाजार्यांच्या हवाली केला गेला, याचा पोलिस शोध घेत आहेत.
पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी नाशिक जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात उघडलेल्या मोहिमेतील ही सर्वात खळबळजनक कारवाई ठरली आहे. अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांना ताश्कंद बागमधील दगडी स्कुलमध्ये शासकीय धान्याचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे पथक गठीत करण्यात येऊन पुरवठा निरीक्षकांच्या उपस्थितीत शनिवारी मध्यरात्री (दि.4) छापा टाकण्यात आला. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना गहु, तांदुळ, मिरची पावडर, हळद पावडर, वटाणे, हरभरे, मुगदाळ व साखर हे कीट देण्यात येते. असा सुमारे 24 लाखांहून अधिक किंमतीचा शिधा मालट्रकमध्ये (एमएच 18 बीजी 7276) भरण्यात येत होता. घटनास्थळावरुन ट्रकचालक शेख उबेद शेख बाबु (27, रा. अक्सा कॉलनी, मालेगाव) व प्रल्हाद दत्तु सावंत (रा. लळींग, ता. जि. धुळे) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
24.43 लाखांचा खुल्या बाजारात विक्रीस प्रतिबंध असलेला शिधा आणि 12 लाखांचा ट्रक, वजन काटे, गोणी, शिवण्याचे मशिन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस निरीक्षक देवरे, पोलिस उपनिरीक्षक विजय गोपाळ, कर्मचारी मनोज चव्हाण, विजय घोडेस्वार, रोहित मोरे यांनी ही कारवाई केली. पुढील तपास सपोनि सावंजी हया करीत आहेत.