सौंदत्तीची यात्रा आजपासून ; बुधवारी मुख्य दिवस, आठ लाख भाविक येणार | पुढारी

सौंदत्तीची यात्रा आजपासून ; बुधवारी मुख्य दिवस, आठ लाख भाविक येणार

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशमधील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या यात्रेला सोमवार (दि. ५) पासून प्रारंभ होत असून याची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. ९ डिसेंबरपर्यंत भरणाऱ्या यात्रेसाठी जवळपास आठ लाखांहून अधिक भाविक येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बुधवार, दि. ७ डिसेंबर रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे.

गेल्या महिन्याभरापासून प्रशासनाकडून स्वच्छतेसह इतर पायाभूत सुविधा देण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे. मंदिर परिसरात सुमारे एक हजार दुकाने उभारण्यासाठी नियोजन सुरू आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे रेणुका देवीची यात्रा स्थगित करण्यात आली होती. यात्रास्थळी पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृहाची उभारणी करण्यात आली असून स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. जवळपास आठ ठिकाणी शौचालयांची व्यवस्था करण्यात आली असून यामध्ये सुमारे पाचशे तात्पुरती शौचालये उभारण्यात आली आहेत. विकासकामे उशिरा हाती घेण्यात आल्याने यात्रेकरूंना काही गैरसोयींना तोंड द्यावे लागणार आहे.

सौंदत्ती : रेणुका देवीचे मंदिर

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मात्र पूर्ण झाली आहे. दहा लाख लिटरचे पाच आणि पाच लाख लिटरच्या १० अशा पंधरा ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारून भक्तांची सोय करण्यात आली आहे. भाविकांना दर्शनासाठी मंदिराच्या भोवताली असलेली दुकाने काढून ती जागा खुली करण्यात आली आहे. यासाठी स्वत: जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी लक्ष घातले आहे. ठिकठिकाणी भाविकांसाठी शेड उभारण्यात आले आहेत. जवळपास सातशे एकर जागेची साफसफाई करण्यात आली आहे. यात्रेसाठी महाराष्ट्रातून ६० ते ७० टक्के भाविक येत असतात. त्यासाठी वाहन पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

 

Back to top button