कोल्हापूर : हेरवाड सरपंचपदाचा मान विधवेला मिळणार का? | पुढारी

कोल्हापूर : हेरवाड सरपंचपदाचा मान विधवेला मिळणार का?

कुरूंदवाड, पुढारी वृत्तसेवा : विधवा प्रथा बंदीचा ठराव करून संपूर्ण देशात आदर्श निर्माण करणार्‍या हेरवाड (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीतील सत्ताधारी आघाडीने सरपंचपदासाठी श्रीमती अनिता ऊर्फ गंगुबाई अशोक कांबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा अर्ज राखून देशामध्ये दुसरा आदर्श निर्माण करणार की, त्यांचा अर्ज माघार घेणार, हे माघारीच्या अंतिम दिवशी स्पष्ट होणार आहे.

विधवा प्रथा बंदीचा ठराव सत्ताधारी विरोधी व सर्वच आघाड्यांनी पुढाकार घेत अमलात आणला आहे. पुन्हा एकदा एकत्रित येऊन विधवा महिलेला सरपंचपदावर संधी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीचा ठराव केला. याचा कायदा करण्यासाठी राज्य सरकारने परिपत्रक काढले. या ठरावाने हेरवाड गावाला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली.

ग्रामपंचायतीतील सरपंचपद हे अनुसूचित जातीतील महिलेसाठी आरक्षित आहे. संपूर्ण गावाने एकत्रित येऊन विधवेला बिनविरोध संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.

सरपंचपदासाठी अन्य अर्जही दाखल झाले आहेत. आघाडी व नेतेमंडळी आपले गट-तट बाजूला ठेवून विधवेला संधी देतील का, हे चित्र अर्ज माघारीच्या अंतिम दिवशीच स्पष्ट होणार आहे.

Back to top button