संजय राऊतांनी नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना ठणकावलं; म्हणाले पक्ष कुणाच्या सांगण्यावरुन... | पुढारी

संजय राऊतांनी नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना ठणकावलं; म्हणाले पक्ष कुणाच्या सांगण्यावरुन...

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपसह शिंदे गटाचा समाचार घेतानाच नाशिकमधील स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाचाही खरपूस समाचार घेतला. पक्ष कुणाच्या सांगण्यावरून नव्हे, तर मातोश्रीवरून चालत असल्याचे सांगत अंतर्गत वादविवाद करून राजकारण करणाऱ्यांना ठणकावले.

गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील शिवसेनेचे (ठाकरे गट) जवळपास डझनभर माजी नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. संबंधितांच्या प्रवेश सोहळ्याची तारीखही जाहीर करण्यात आली होती. परंतु, प्रवेश सोहळ्याला काही मुहूर्त लागला नाही. यामुळे त्या १२ नगरसेवकांच्या प्रवेशाची चर्चा केवळ चर्चा राहिली असून, यासंदर्भातील अफवा ठाकरे गटातूनच काही पदाधिकाऱ्यांनी उठविल्याचे आता बोलले जात असल्याने ठाकरे गटातही अलबेल नसल्याची बाब समोर आली आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांचा पत्ता कट करून संबंधितांच्या नावावर कायमची फुली मारण्यासाठीच हा प्रकार सुरू आहे की काय अशी शंकादेखील उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत शिवसेना नेते राऊत यांना विचारले असता फुली मारण्याचे काम कुणाच्याही हातात नाही. पक्ष मातोश्रीवरून चालतो. कुणाच्या सांगण्यावरून नसल्याचे राऊतांनी स्पष्ट केले. राऊत यांच्या या स्पष्टीकरणामुळे त्यांनी एकप्रकारे अंतर्गत वाद निर्माण करणाऱ्यांना खडे बोल सुनावले असून, आगामी काळात शिंदे गटासह भाजपला टक्कर द्यायची असेल आणि बंडाळी टाळायची असेल तर वाद टाळण्याची सूचनाही राऊत यांनी अप्रत्यक्षरीत्या केली आहे.

डॅमेज, फूट प्रकार नाही

नाशिकमध्येच नव्हे, तर राज्यातही इतरही ठिकाणी शिवसेना पक्ष (ठाकरे गट) डॅमेज झालेला नाही की कोणत्याही प्रकारचा फाटाफूट झालेली नाही. शिवसेना जशी आहे अगदी तशीच असून, शिवसेना नव्या जोमाने पुन्हा उभी राहील, असा आशावादही राऊत यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

Back to top button