सप्तशृंगगडावर दूषित पाणीपुरवठा, ग्रामस्थांसह भाविकांचे आरोग्य धोक्यात | पुढारी

सप्तशृंगगडावर दूषित पाणीपुरवठा, ग्रामस्थांसह भाविकांचे आरोग्य धोक्यात

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा

देवी दर्शनासह पर्यटनासाठी हजारो भाविकांचा राबता असलेल्या सप्तशृंगगडावर दूषित पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांसह भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

सप्तशृंगगडावर सुमारे तीन हजारांहून अधिक लोकसंख्या असून, दिवसभर हजारो भाविक, पर्यटकांची ये-जा असते. मात्र, येथे गेल्या दोन दिवसांपासून सर्वच सार्वजनिक नळांना गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत माजी ग्रामपंचायत सदस्य विजय दुबे यांनी यापूर्वीदेखील तक्रार केली होती. परंतु ग्रामसेवकांसह सरपंच, सदस्यांनी दखल न घेतल्याने व दूषित पाणीपुरवठा सुरूच असल्याने याबाबत ग्रामसभेतही तक्रार करण्यात आली आहे.

सप्तशृंगगडवासीयांसाठी लाखो रुपये खर्चून गावालगत जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र, हे केंद्रच समस्यांच्या गर्तेत असून येथून दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गटविकास अधिकाऱ्यांकडेही तक्रार
प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष कन्हैया जाधव यांनी 15 दिवसांपूर्वी याबाबत कळवणला गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केले होती. मात्र, उपयोग झाला नाही. स्वच्छ पाणीपुरवठा न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे.

तक्रार करूनही ग्रामपंचायतीने दखल घेतली नाही. दूषित पाण्याचा पुरवठा सुरूच आहे. याबाबत जाब विचारला असता, उडवाउडावीची उतरे मिळतात. समस्या न सोडवल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली जाईल.

– अजय दुबे, सामाजिक कार्यकर्ते, सप्तशृंगगड.

हेही वाचा :

Back to top button