नाशिक : सिटीलिंक बसचे प्रवासी भाडे सात टक्क्यांनी वाढणार | पुढारी

नाशिक : सिटीलिंक बसचे प्रवासी भाडे सात टक्क्यांनी वाढणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंक शहर बससेवेच्या प्रवाशी भाड्यात पाच टक्क्यांऐवजी सात टक्के इतकी वाढ होणार आहे. यामुळे त्याचा फटका सामान्य प्रवासी तसेच विद्यार्थ्यांनाही बसणार आहे.

महापालिकेची सिटीलिंक बससेवा जुलै २०२० मध्ये सुरू झाली. या जवळपास अडीच वर्षांच्या कालावधीत कोरोना महामारीमुळे शहर बससेवेला आर्थिक फटकाही सहन करावा लागला. नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या नियमानुसार दरवर्षी पाच टक्के इतकी प्रवासी भाडेवाढ करता येते. त्यानुसार मागील महिन्यात आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतही प्रवासी भाडेवाढीस मंजुरी देण्यात आली असली तरी ही भाडेवाढ मात्र पाच टक्क्यांऐवजी सात टक्के इतकी करण्यात येणार असून, त्यास मान्यतेकरता रिजनल ट्रान्स्पोर्ट ॲथॉरिटीकडे महानगर परिवहन महामंडळामार्फत प्रस्ताव सादर केला जाणार आहे. सिटीलिंकमार्फत सध्या २५० हून अधिक बसेस शहर व शहराबाहेरील ग्रामीण भागातील ६३ मार्गांवरून धावत आहेत. मनपा हद्दीपासून २० किमीच्या परिघात असलेल्या त्र्यंबक, सिन्नर, दिंडोरी या तालुक्यांतील काही गावांपर्यंतदेखील सिटीलिंककडून सेवा पुरविली जात आहे.

सुट्टे पैसे नसल्याने राउंडफिगर भाडे

सध्या असलेले तिकीट दर आकारताना बऱ्याचदा सुट्ट्या पैशांच्या अडचणी निर्माण होत असल्याने वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद निर्माण होत असतात. त्यामुळे त्यावर उपाययोजना म्हणून तिकिटाचे दर राउंडफिगरमध्ये करण्यात येणार आहे. या राउंडफिगरमुळे तिकीटदरातील वाढीचा प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे. तसेच शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रवासी पासच्या दरातही वाढ होणार आहे.

Back to top button