नगर : मला बी घेऊ द्या की पाटी नि पेन्सिल , हंगामी स्थलांतरित 606 विद्यार्थी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात | पुढारी

नगर : मला बी घेऊ द्या की पाटी नि पेन्सिल , हंगामी स्थलांतरित 606 विद्यार्थी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात

नगर : पुढारी वृत्तसेवा : दिपावलीनंतर हातावर पोट असणारे असंख्य मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर स्थलांतर करतात. त्यामुळे कुटूंबातील मुलेही शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडलेली दिसली आहेत. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी शिक्षण विभागाने शिक्षण हमी कार्ड योजना हाती घेतली आहे. जिल्ह्यात अशाप्रकारे 192 मुले हे जिल्ह्यातून बाहेर पडली आहेत, तर 414 मुले आपल्या आई-वडिलांसमवेत जिल्ह्यात आल्याचे सर्वेत पुढे आले आहे. या मुलांना शिक्षण विभागाकडून जवळच्या शाळेत प्रवेश दिला जात आहे. जिल्ह्यात हंगामी स्थलांतर करणार्‍या कुटुंबाची संख्या कमीकमी होत असली, तरी अजुनही ती चिंताजनकच आहे.

संबंधित कुटूंबे हे दिवाळीपूर्वीच आपल्या मालकांकडून उचल घेतात. सणोत्सव साजरा होताच असे कुटूंब मुलाबाळांसह ऊसतोड, वीटभट्टी, औद्योगिक आस्थापना, रेल्वे स्टेशन व अन्य परिसरात मजुरीवर जातात. यावेळी अशी मुलेही शाळेपासून दूरावलेली असतात. यातून दरवर्षी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊन अक्षरशः मुले शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडत असल्याचे वास्तव आहे. हीच परिस्थिती पाहून शासनाने हंगामी स्थलांतरीत कुटूंबे आणि त्यांची शालेय मुले यांची माहिती संकलित करण्याची मोहीम हाती घेतली.

शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनात उपशिक्षणाधिकारी विलास साठे यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकांसोबत 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत हा सर्व्हे हाती घेतला अहे. या सर्व्हेक्षणातील स्थलांतरीत आढळणार्‍या मुलांना जवळच्या शाळेत प्रवेश दिला जात आहे.

काय आहे शिक्षण हमी कार्ड!

उदरनिर्वाहासाठी कुठेही स्थलांतर झाले, तरी त्या कुटुंबातील मुलांचे शिक्षण सुरूच ठेवण्यासाठी शिक्षण हमी कार्ड योजना महत्वाची ठरत आहे. विद्यार्थ्यांना स्थलांतरीत होण्यापूर्वी शिक्षण हमी कार्ड देण्यात येणार आहे. या कार्डव्दारे ते विद्यार्थी जेथे जातील, तेथे ते कार्ड दाखवून त्यांचे पुढील शिक्षण सुरू होईल. या कार्डमध्ये संबंधित मुलाचे कौशल्य, वाचन, लेखन इत्यादीची माहिती असते. जणू हेच प्रगतीपुस्तक दुसर्‍या शाळेत दाखवून त्यातून पुढे शिक्षण सुरू केले जाते.

बालरक्षक अ‍ॅपची निर्मिती!

महाराष्ट्र शासन आणि टाटा ग्रुप यांनी बालरक्षक अ‍ॅपची निर्मिती केली आहे. या अ‍ॅपवर हंगामी स्थलांतर आढळलेल्या मुलांची माहिती अपलोड करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला करण्यात आल्या आहेत. त्यासाठी ऊसतोड मजुरांची अड्डे, वीटभट्टी, औद्योगिक परिसरात सर्वेक्षण करण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत.

नगरमध्ये 414 मुले दाखल !

रोजंदारीसाठी औरंगाबाद, जळगाव, नाशिक, अमरावती, बीड, नंदुरबार, कल्याण यासह उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, झारखंड या ठिकाणाहून 414 मुले नगर जिल्ह्यात आलेली आहेत. यामध्ये 243 मुले आणि 171 मुलींचा समावेश आहे.

Back to top button