नाशिक : दिव्यांगांना सिटीलिंककडून 75 टक्के सवलत | पुढारी

नाशिक : दिव्यांगांना सिटीलिंककडून 75 टक्के सवलत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मोफत प्रवासी कार्ड नसलेल्या दिव्यांगांनाही महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंकमार्फत प्रवास भाड्यात 75 टक्के सवलत मिळणार आहे. येत्या 1 डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

सिटीलिंकने शहरातील दिव्यांग प्रवाशांसाठी मोफत प्रवास योजना तयार केली आहे. आवश्यक कागदपत्रे सिटीलिंककडे जमा करणार्‍या दिव्यांगांना मोफत कार्ड दिले जात आहे. योजनेचा लाभ महापालिका हद्दीबाहेर राहणार्‍या परंतु, शहरात कामानिमित्त येणार्‍या दिव्यांग प्रवाशांना मिळत नव्हता. शहराबाहेरील दिव्यांग प्रवाशांची गैरसोय लक्षात घेत नाशिक महापालिका हद्दीतील तसेच हद्दीबाहेरील दिव्यांग प्रवासी ही अट बाजूला ठेवत मोफत कार्ड नसलेल्या दिव्यांग प्रवाशांनासुद्धा तिकिटात पूर्वीप्रमाणे 75 टक्के सवलतीचा निर्णय सिटीलिंकने घेतला. त्यासाठी दिव्यांग प्रवाशांना आधारकार्ड व शासनाचे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र प्रवासावेळी सोबत ठेवणे अनिवार्य आहे. तसेच अपंगत्वाचे प्रमाण 65 टक्केपेक्षा जास्त असल्यास अशा दिव्यांग प्रवाशांसोबत असलेल्या साथीदारासदेखील तिकिटात 50 टक्के सवलत मिळेल. सिटीलिंकमार्फत मोफत कार्ड दिलेल्या दिव्यांग प्रवाशांना प्रवास करताना वाहकाकडून शून्य मूल्याचे तिकीट घेणे अनिवार्य आहे. असे तिकीट न घेतल्यास विनातिकीट प्रवासी समजून कारवाई करण्यात येईल. मोफत कार्ड नसलेल्या दिव्यांग प्रवाशांनी 1/4 मूल्याचे तिकीट वाहकाकडून घ्यावयाचे आहे. अन्यथा प्रवासी विनातिकीट समजून कारवाईचा इशारा सिटीलिंकने दिला.

हेही वाचा:

Back to top button