राहुरी : विरोधकांचा प्रशासकीय कामांचा अभ्यास कच्चा : आमदार प्राजक्त तनपुरे | पुढारी

राहुरी : विरोधकांचा प्रशासकीय कामांचा अभ्यास कच्चा : आमदार प्राजक्त तनपुरे

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : कावळा बसला आणि फांदी मोडली.. आणि तीच फांदी हातात घेऊन राहुरी शहरातील आमच्या विरोधकांनी आम्हीच विकासकामांचे धनी, असे सांगत सुरू केलेला कांगावा मोठा हास्यास्पद आहे. माझ्याकडे नगरविकास खात्याचे राज्यमंत्री पद असताना दोन वर्षांपासून भुमीगत गटार योजनेसाठी केलेल्या कामकाजाचा पाठपुरावा व बैठकांचे पुरावे असतानाही विकास मंडळाचे रावसाहेब चाचा तनपुरे यांचा योजना मंजूर करण्यासाठी आम्हीच पराकाष्टा केल्याचे सांगत श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न म्हणजे पावसाळ्यात जशा ‘भुईछत्र्या’ उगवतात तसा आहे.

पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन विरोधकांना जाग आल्याचा प्रकार असल्याचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगत विरोधकांच्या अज्ञानाबाबत चांगलीच खिल्ली उडवली. विकास कामांसाठी आम्ही कधीही सत्ताधारी विरोधक असा दुजाभाव केला नसून यापुढेही करणार नाही. तांत्रिक मंजुरी प्रक्रिया झाली आता प्रशासकीय मंजुरी आणत काम सुरू करा. आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशी प्रतिक्रिया पत्रकार परिषदेमध्ये आमदार तनपुरे यांनी देत विरोधकांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

याप्रसंगी आ. तनपुरे यांनी सांगितले की, मागील पाच वर्षात शहरात कोठेही विरोधक दिसत नव्हते. पालिकेवर प्रशासक नेमल्यानंतर विरोधकांना निवडणुकीची चाहूल लागली. शहरात आम्हीच विकासदूत असा साक्षात्कार त्यांना होत आहे. राज्यात नगरविकास खाते असतानाही मला पालिकेची भुमीगत गटार योजना व रस्त्यांचे काम करता आले नसल्याचा आरोप चाचा तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्याबाबत आ. तनपुरे यांनी सांगितले की, पालिका हद्दीमध्ये नगरोत्थान योजना राबविताना प्रथमतः पाणी योजना, त्यानंतर भुमीगत गटार येाजना पूर्ण झाल्यानंतर अंतर्गत रस्त्याला निधी मिळतो.

पाणी योजना पूर्ण केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकाळात राहुरी नगरपरिषदेने भुमीगत गटार योजनेसाठी सन 2021 मध्ये बैठका घेतल्या. भूमीगत गटार योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमला. नगरविकास खात्याचे अधिकारी, जीवन प्राधिकरण व मुख्याधिकारी यांसह राज्यमंत्री म्हणून वेळोवेळी बैठका घेतल्याचे सर्व पुरावे प्रसारमाध्यमात आजही उपलब्ध आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत राहुरी नगरपरिषदेने दिलेले वेगवेगळे ठराव व बैठकांमध्ये घेतलेले निर्णय आजही कागदोपत्री उपलब्ध आहे. योजनेला तांत्रिक मंजुरी मिळत असताना नगरविकास खात्याचा राज्यमंत्री म्हणून बैठक घेतली. यामध्ये काही त्रुट्या दूर केल्या.

शहराची वाढ उत्तर दिशेने वाढत आहे. प्रत्येक हद्दीतून सांडपाणी वहन होऊन ते एसटीपी प्लांट पर्यत आणण्यासाठी उतार असणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन त्याचे योग्य नियोजन केले. एसटीपी प्लांट हा तनपुरे वाडी हद्दीत होणार होता. मालकी हक्क, परिसरात होणारी दुर्गंधी तसेच अपुर्‍या जागेचा विचार करता एसटीपी जागा बदलण्याचा निर्णय आम्हीच घेतला. राज्यात महाविकास आघाडी शासन अस्तित्वात असताना भुमीगत गटार योजनेची सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती. दुर्देवाने महाविकास आघाडी शासन कोसळले.

राज्यात शिंदे शासनाने अनेक विकासकामांना स्थगिती दिली. परंतु सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झालेल्या भुमीगत गटार योजनेला मंजुरी दिल्याचे आम्ही मान्य करतो. पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्फत त्या योजनेला 132 कोटी रूपयांच्या निधीला तांत्रिक मंजुरी मिळाली. आता पंधरा दिवसात प्रशासकीय मंजुरी घेऊन काम सुरू व्हावे, अशी आमची प्रमाणिक इच्छा आहे. शहराच्या विकास कामात आम्ही कधीच राजकारण करणार नाही.

महाविकास आघाडी शासन काळात मंजूर झालेल्या कोट्यवधी रूपयांच्या निधीला शिंदे-फडणवीस शासनाने स्थगिती दिली. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी धमक असेल तर स्थगिती मिळालेल्या कामांना पुन्हा निधी मिळवून द्यावा. माजी आमदार शिवाजीराव कर्डिले हे 2014 ते 2019 काळात आमदार होते. त्यांनी राहुरी शहराला हायमॅक्स वगळता एक पैशाचा निधी दिला नाही. त्या तुलनेत अडीच वर्षातच मी 20 ते 25 कोटी रूपयांचा अतिरीक्त निधी मिळविल्याचे आ. तनपुरे यांनी सांगितले.

त्यांना ‘अमृत-2’ समजणार कसे?
चाचा तनपुरे यांनी नगरविकास खात्याचे मंत्री असतानाही ‘अमृत-2’ योजना राहुरीत का? राबवली नाही, असा हास्यास्पद प्रश्न उपस्थित केल्याचे सांगत आमदार तनपुरे यांनी चांगलीच खिल्ली उडवली. ‘अमृत- 2’ योजनेमध्ये एक लाख लोकसंख्या असलेल्या 500 शहरांची निवड होऊन त्यांना सन 2015 ते 2019 काळात योजना पूर्ण करण्याची अवधी दिली. वेळेत कामे न झाल्याने संबंधित शहरांना मुदवाढ मिळाली. राहुरी शहराची एक लाख लोकसंख्या झाल्याचा साक्षात्कार चाचा तनपुरे यांना कसा झाला? असे विचारत आ. तनपुरे यांनी विरोधकांना अमृत योजनेचा अभ्यास करण्याची विनवणी केली.

त्यामुळेच त्यांची पत्रकार परिषदेकडे पाठ
मागील दोन वर्षामध्ये राहुरी नगरपरिषदेतील नगरसेवकांनी भुयार गटार योजनेला कसा पाठपुरावा केला? किती बैठका घेतल्या हे विरोधी असलेल्या नगरसेवकांना ठाऊक होते. त्यामुळेच बहुसंख्य विरोधी नगरसेवक चाचा तनपुरे यांच्या पत्रकार परिषदेला फिरकले नाही. तशी तोंडी चर्चाही विरोधी नगरसेवकांनी आमच्याशी केल्याचा गौप्यस्फोट आमदार तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

 

Back to top button