नाशिक : साखर परस्पर विकून साडेअकरा लाखांचा गंडा | पुढारी

नाशिक : साखर परस्पर विकून साडेअकरा लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

एका व्यावसायिकाने ३३० क्विंटल साखरेची परस्परविक्री करून दुसऱ्या व्यावसायिकास सुमारे साडेअकरा लाख रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी लेहरचंद रतिलाल लोढया (६७, रा. बळीमंदिराजवळ, पंचवटी) यांनी आडगाव पोलिस ठाण्यात संशयित रोशन लक्ष्मण भोजवाणी (रा. सुभाषरोड, नाशिकरोड) यांच्याविरोधात अपहार आणि फसवणुकीची फिर्याद दाखल केली.

लेहरचंद यांच्या फिर्यादीनुसार, संशयित भोजवानी यांनी मे २०१८ पासून फसवणूक केली. लेहरचंद यांची दीप ट्रेडर्स फर्म असून, संशयित भोजवानी यांची दीपेश ट्रेडिंग कंपनी आहे. दीप ट्रेडर्स फर्ममधून संशयित भोजवानी यांनी व्यवहार करून संगमनेरच्या थोरात सहकारी साखर कारखाना तसेच प्रवरा सहकारी साखर कारखाना येथून लेहरचंद यांच्या नावाच्या बिलावर ११ लाख ४३ हजार रुपयांची ३३० क्विंटल साखर परस्पर स्वत:च्या गोदामात उतरवली. लेहरचंद यांनी या साखरेचे बिल भोजवानी यांना दिलेले नव्हते. त्याचा गैरफायदा भोजवानी यांनी घेतला व साखरेची परस्परविक्री केल्याचा आरोप लेहरचंद यांनी केला आहे. लेहरचंद यांनी भोजवानी यांच्याकडे साखरेच्या बिलाचे पैसे मागितले असता भोजवानी यांनी दमदाटी करीत पैसे देण्यास नकार दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. सुरुवातीस लेहरचंद यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आडगाव पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार भोजवानीविरोधात गुन्हा दाखल करत आडगाव पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हेही वाचा:

Back to top button