Nagpur Winter Sessions : हिवाळी अधिवेशनासाठी विधान भवनातील तयारीला वेग | पुढारी

Nagpur Winter Sessions : हिवाळी अधिवेशनासाठी विधान भवनातील तयारीला वेग

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : नागपुरात येत्या १९ डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Nagpur Winter Sessions) सुरू होणार आहे़. यापूर्वी २०१९ मध्ये नागपुरात अधिवेशन झाले होते. दोन वर्षे कोरोना संक्रमणामुळे अधिवेशन होऊ शकले नाही़. दोन वर्षानंतर होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे़.

नागपूर राज्याची उपराजधानी आहे. नागपूर करारानुसार किमान तीन आठवड्याचे अधिवेशन नागपुरात (Nagpur Winter Sessions)  अपेक्षित आहे. किंबहुना आर्थिक, भौतिक अनुशेष दूर करण्यासाठी विदर्भाचे मागासलेपण दूर करण्यासाठी खरेतर तत्कालीन राज्यकर्त्यांनी नागपूर करार केला. मात्र, तो गेल्या अनेक वर्षांचा इतिहास पाहता तो पाळला गेला नाही हे वास्तव आहे. यावर्षी देखील 19 ते 30 डिसेंबर असा या अधिवेशनाचा कालावधी असला तरी प्रत्यक्षात 10 दिवसांचेच कामकाज होणार आहे. यातही विदर्भाचे किती प्रश्न सुटतात इतकेच नव्हेतर चर्चिले जातात, हे येणारा काळच सांगणार आहे.

मोठ्या राजकीय घडामोडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार सत्तेवर आले आहे. नागपुरातील विधानभवन परिसरात कामे सुरू केली आहेत. समोरील उद्यान, हिरवळ, बागबगीचा स्वच्छ केला जात आहे. विधानसभा सभागृहातील खुर्च्या, माईक सारेकाही चकाचक झाले आहे. एकंदरीत नवे सरकार नव्या आव्हानांसाठी तयार होत असतानाच विधानभवन परिसर, आमदार निवास सगळीकडे नवा लूक देण्याचा प्रयत्न चालला आहे. समोर शामियाना टाकण्यात आला आहे. विधिमंडळ सचिवालयाचे कर्मचारी येण्यास काहीसा उशीर असला तरी दोन वर्षे अधिवेशनच न झाल्याने नव्या सरकारकडून विशेष तयारी केली जात आहे. सुमारे ९८ कोटी रुपयांचा खर्च या अधिवेशनाशी संबधित विविध कामांवर अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button