नाशिक : आश्रमातील पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता | पुढारी

नाशिक : आश्रमातील पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रो हाउसमधील आश्रमात संस्थाचालकाने आदिवासी मुलींवर शिक्षण व सांभाळ करण्याच्या बहाण्याने केलेल्या अत्याचार प्रकरणातील पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. आपणावरही अत्याचार झाल्याचे आणखी एका पीडित मुलीने पोलिसांना सांगितले आहे.

पंचवटीत रो हाउसमध्ये द किंग फाउंडेशन संचलित गुरुकुल ज्ञानदीप आश्रमाच्या नावे संशयित हर्षल मोरे (32, रा. मानेनगर, म्हसरूळ) याने आदिवासी मुला-मुलींचा सांभाळ करण्यासाठी सुरू केलेल्या आश्रमासाठी कोणत्याही शासकीय विभागांची पूर्वपरवानगी घेतलेली नव्हती. एका पीडितेने हर्षल मोरे याने अत्याचार केल्याची तक्रार केल्यानंतर इतर मुलींनीही अत्याचाराबाबत वाचा फोडली. त्यामुळे हर्षल विरोधात म्हसरूळ व सटाणा पोलिस ठाण्यात पोक्सोसह अत्याचार, अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करत अटक करून त्याला बुधवार (दि.30)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी एका पीडितेने पोलिसांशी संपर्क साधत अत्याचार झाल्याची तक्रार केली. मात्र, संबंधित पीडिता अद्याप पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यासाठी आली नसल्याचे समजते. त्यामुळे पोलिस या आश्रमातील माजी विद्यार्थिनींकडेही चौकशी करण्याची शक्यता आहे. बुधवारी संशयित मोरे यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. इतर पाच गुन्ह्यांमध्येही त्यास पोलिस अटक करणार आहे.

रोख स्वरूपात देणगी
पोलिसांच्या प्राथमिक तपासात हर्षल मोरे हा देणगीदारांकडून बहुतांश वेळा रोख स्वरूपातच देणगी स्वीकारत व पुढील व्यवहारही रोख स्वरूपात करत असल्याचे समोर आले. त्यामुळे देणगीदारांकडून हर्षल मोरे याने किती देणगी स्वीकारली व त्याचा वापर कसा केला याचा उलगडा करण्याचे आवाहन यंत्रणेसमोर राहणार आहे.

हेही वाचा:

Back to top button