एमपीएससी : चापडगावकरांतर्फे ग्रामीण भागातील यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार | पुढारी

एमपीएससी : चापडगावकरांतर्फे ग्रामीण भागातील यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार

नाशिक (चापडगाव) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर तालुक्यातील चापडगाव येथील रहिवासी व पंचक्रोशीत ‘चेअरमन’ या टोपन नावाने प्रसिद्ध असलेले कै. कचरू आव्हाड यांचा नातू अरुण तुकाराम आव्हाड याने एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन आजोबांचे स्वप्न प्रत्यक्षात आणले. आव्हाड कुटुंबाने प्रतिकूल परिस्थितीत शेती करत मुलाला अधिकारी करण्याचे स्वप्न उराशी बाळगले. मुलानेसुद्धा जिद्द व अभ्यासाच्या बळावर कुटुंबाच्या परिश्रमाच्या धाग्याची वीण घट्ट करत एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.

अरुण हा चापडगाव येथील सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण जि. प. प्राथमिक शाळा चापडगाव येथे झाले. माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल दापूर येथे झाले. लहानपनापासून हुशार आणार्‍या अरुणचे अधिकारी व्हायचे स्वप्न असल्याने अभ्यासाकडे अधिक कल होता. ग्रामीण भागातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन प्रशासनात आलेला अरुण हा महाविद्यालयाचा पहिला विद्यार्थी आहे. त्याने कोणत्याही प्रकारचे खासगी क्लासेस न लावता स्वतःच्या जोरावर हे यश संपादन केले. चापडगाव ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच दगू आव्हाड, रामनाथ सांगळे, सुभाष सांगळे, बाबूराव सांगळे, अनिल सांगळे, संदीप सांगळे, अंबादास आव्हाड, फुलचंद सांगळे, राम आव्हाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

पंचक्रोशीतून अभिनंदनाचा होतोय वर्षाव…
आपल्या या यशात स्वर्गीय आजोबांबरोबरच चुलते शांताराम आव्हाड, वडील तुकाराम आव्हाड तसेच संपूर्ण कुटुंबाचा सिंहाचा वाटा असल्याचे अरुण सांगतो. त्याच्या या यशात त्याच्या अधिकार्‍याचे गुण हेरून प्रत्येक टप्प्यावर त्याला मार्गदर्शन करणारे गुरुवर्य शांताराम आव्हाड, संजय आव्हाड, सोमनाथ गिरी यांचा सिंहाचा वाटा असल्याचे तो आवर्जून नमूद करतो. त्याला या निर्भेळ यशाने तो हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ठरला आहे. त्याच्या या यशानिमित्त पंचक्रोशीतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा:

Back to top button