नाशिक : पीएफआय प्रकरणी संशयितास न्यायालयीन कोठडी | पुढारी

नाशिक : पीएफआय प्रकरणी संशयितास न्यायालयीन कोठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

देशात धार्मिक व जातीय तेढ निर्माण करण्याच्या आराेपाखाली एनआय व महाराष्ट्र एटीएसने अटक केलेल्या पीएफआयशी संबंधित सातव्या संशयितास जिल्हा न्यायाधीश ए. यू. कदम यांनी साेमवारी (दि.२८) न्यायालयीन काेठडी सुनावली आहे. त्यामुळे या संशयिताची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

इरफान दौलत खान नदवी ऊर्फ मौलाना इरफान खान (३५, रा. गुलशेरनगर, मालेगाव) असे सातव्या संशयिताचे नाव आहे. त्याला १३ नाेव्हेंबरला मालेगाव येथून अटक केली हाेती. एटीएसने यापूर्वी अटक केलेल्या सहा संशयितांसोबत खानचा संपर्क असल्याचे तपासात समोर आले होते. या प्रकरणात तपास यंत्रणांनी एकूण सात संशयितांना अटक केली आहे. न्यायालयाने सर्व संशयितांना पाेलिस काेठडी व त्यानंतर न्यायालयीन काेठडी सुनावली आहे. दरम्यान, खान याच्या काेठडीची मुदत संपल्याने त्यास सोमवारी (दि.२८) न्यायालयात हजर करण्यात आले होते.

सप्टेंबर महिन्यात तपास यंत्रणांनी देशभरात एकाच वेळी कारवाई करत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पीएफआय) संशयित सदस्य व पदाधिकाऱ्यांची धरपकड केली होती. या संशयितांच्या संपर्कात असलेल्या मौलवी इरफान खान यास एटीएसने अटक केली. खान याने औरंगाबाद, बीड, जालना, नांदेड या शहरांमध्ये नूपुर शर्माच्या निषेधार्थ सोशल मीडियातून आंदोलनाची धार तीव्र केली होती. त्याने व्हॉट्सॲपच्या एका ग्रुपमधून मुस्लीम समाजात चिथावणीखोर मॅसेजद्वारे सशस्त्र जातीय संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात केला हाेता.

हेही वाचा :

Back to top button