कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मंगळवार (दि. 29) पासून दोन दिवसांच्या कोल्हापूर दौर्यावर येत आहेत. दुपारी चार वाजता मनसेचे कार्यकर्ते ताराराणी चौकात त्यांचे जंगी स्वागत करणार आहेत. स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. शहराच्या मुख्य चौकांमध्ये ठाकरे यांच्या स्वागताचे फलक झळकले आहेत. ठाकरे यांचे स्वागत झाल्यांनतर काही काळ ते हॉटेल सयाजी येथे थांबणार आहेत.
मंगळवारी सायंकाळी सहा वाजता शासकीय विश्रागृहामधील राजर्षी शाहू सभागृहामध्ये लोकसभा मतदारसंघनिहाय दोन बैठका होणार आहेत. यावेळी संपर्कप्रमुख जयराज लांडगे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीसाठी अधिकृत पदाधिकार्यांना पासेस दिले आहेत. या बैठकीत राज ठाकरे स्वतः सर्व पदाधिकार्यांशी स्वतंत्रपणे चर्चा करून आगामी राजकीय वाटचालीची भूमिका सांगणार आहेत. बैठकीनंतर ठाकरे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. दिवसभराच्या कार्यक्रमानंतर त्यांचा कोल्हापुरात मुक्काम आहे
राज ठाकरे बुधवारी (दि.30) सकाळी 9 वाजता राजर्षी शाहू समाधीस्थळाल, तर त्यानंतर सव्वानऊ वाजता शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणार आहेत. सकाळी 9.30 वाजता अंबाबाईचे दर्शन घेऊन ते कोकण दौर्यासाठी रवाना होणार आहेत.