जळगाव : अतिक्रमण प्रश्नी मोर्चेकरी आक्रमक; पालकमंत्र्यांनी रस्त्यावर मांडला ठिय्या

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढू नये, या मागणीसाठी संविधान दिनी बहुजन वंचित आघाडीच्या वतीने जी.एस.मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने ठिय्या आंदोलनाची कोणतीही दखल न घेतल्याने आंदोलनकर्ते यांनी आकाशवाणी चौकात येवून थेट रस्ता रोको आंदोलन केले.
दरम्यान, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आकाशवाणी चौकात आंदोलकांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी थेट महामार्गावरच बसून त्यांच्याशी चर्चा करून समस्येचे निराकरण करण्याची ग्वाही दिली.
पोलिस आणि आंदोलकांमध्ये खडाजंगी
गायरान जमिनीवर अनेक वर्षांपासून नागरिक वास्तव्य करीत आहेत. मात्र, आता शासनाने या गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिल्याने या जमिनीवर वास्तव्य करत असलेले हजारो नागरिक बेघर होणार आहेत. त्यामुळे ही कारवाई थांबविण्यात यावी आणि संबंधित नागरिकांसाठी पर्यायी उपाययोजना करण्यात यावी, या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या कारवाईविरोधात आंदोलक आक्रमक झाले. पोलीस आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत आंदोलनकर्त्यांची काही वेळ खडाजंगी झाली. आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मंत्री गुलाब पाटील यांनी महामार्गावरच बसून आंदोलकांच्या मागण्या समजून घेतल्या.
आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या.न्यायालयाचे आदेश असल्याने यात आपल्याला काही करता येणे शक्य नाही. मात्र हा विषय आपण सरकार दरबारी मांडून त्यात काही करता येण्यासारखे असेल तर ते करण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी तात्पुरती दोन दिवसांसाठी कारवाई स्थगित करीत असल्याचं आश्वासन आंदोलकांना दिले. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
हेही वाचा :
- यवतमाळ : आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने सख्ख्या भावांची १५ लाखांची फसवणूक
- सोलापूर: ॲड.सदावर्तेंवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक
- रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करा, असे सांगणारा मीच होतो : मंत्री अब्दुल सत्तार