महाविरण : परिमंडळात 6.68 लाख कृषी ग्राहकांना दिलासा | पुढारी

महाविरण : परिमंडळात 6.68 लाख कृषी ग्राहकांना दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील कृषिपंप वीज ग्राहकांकडून सक्तीची वसुली थांबविताना वीज कनेक्शन तोडू नये, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. शेतकर्‍यांनी किमान चालू महिन्याचे बिल भरण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. या निर्णयामूळे महावितरणच्या नाशिक परिमंडळातील 6 लाख 68 हजार 728 ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

वीज उत्पादन आणि वितरणावरील खर्च आणि वाढता थकबाकीचा डोंगर यामुळे महावितरणला त्यांचा दैनंदिन कारभार चालविणे जिकिरीचे झाले आहे. महावितरणचे नाशिक परिमंडळाअंतर्गत नाशिक व नगर जिल्ह्यांत 6 लाख 81 हजार कृषिपंप वीज ग्राहक आहेत. यापैकी 12 हजार 272 ग्राहक कृषिपंपांचे नियमित वीजबिल भरतात. मात्र, उर्वरित 6 लाख 68 हजार 728 ग्राहकांकडे तब्बल 8 हजार 384 कोटी 63 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणने गेल्या काही महिन्यांपासून थकबाकी असलेल्या कृषिपंप वीजग्राहकांकडे मोर्चा वळविला आहे. या ग्राहकांना थकबाकी भरण्यासाठी नोटीस बजाविताना प्रसंगी कनेक्शन तोडण्याची कारवाई महावितरणचे पथके करता आहेत. शेतकर्‍यांमध्ये महावितरणविरुद्ध रोष पसरला आहे. चालू वर्षी राज्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे अगोदरच बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यामध्ये महावितरणच्या कारवाईने बळीराजाचा पाय अधिक खोलात गेला आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना मदतीचा हात देण्याची आवश्यकता असल्याने उपमुख्यमंत्र्यांनी कृषिपंपधारकांकडून सक्तीची वीजवसुली थांबविण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश देताना खरिपाचा हंगाम हातचा गेल्यानंतर आता रब्बीवरच शेतकर्‍यांची सारी भिस्त आहे. अशावेळी वीजजोडणी तोडल्यास शेतकर्‍यांसमोरील अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे सक्तीची वीजबिल वसुली थांबविण्यास सांगण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे नाशिक परिमंडळातील साडेसहा लाखांहून अधिक शेतकर्‍यांना मदत होणार आहे.

नाशिक परिमंडळ स्थिती अशी…
एकूण कृषिपंप ग्राहक – 6 लाख 81 हजार.
एकूण थकबाकी – 8 हजार 384 कोटी 63 लाख.
थकबाकीदार ग्राहक – 6 लाख 68 हजार 728
नियमित बिल भरणारे – 12 हजार 272

हेही वाचा:

 

Back to top button