प्रतिक्विंटल 4,500 रुपये भाव द्यावा : भात उत्पादकांची मागणी | पुढारी

प्रतिक्विंटल 4,500 रुपये भाव द्यावा : भात उत्पादकांची मागणी

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्यात भाताची अचानक आवक वाढल्याने भाव गडगडले असून शेतकरी हतबल झाले आहेत. भाताच्या दरवाढीच्या प्रश्नावर बाजार समितीही दखल घेत नाही अन् प्रशासनाचेही नियंत्रण नसल्याने शेतकरी भरडला गेला आहे. त्यामुळे शासनाने शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी भाताला आधारभूत प्रतिक्विंटल 4500 रुपये भाव द्यावा व एकाधिकार भात खरेदी योजना तत्काळ सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.

इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक शेतकर्‍यांची महत्त्वपूर्ण बैठक घोटी येथे घेण्यात आली. शेतकरी नेते विश्वनाथ पाटील (ठाणे) उपस्थित होते. त्यांनी शेतकर्‍यांच्या भावना व तळमळ लक्षात घेऊन शासनाचे लक्ष वेधू अशी ग्वाही दिली. भाताचे उत्पादन व खर्च यांचा मेळ बसत नाही, वर्षभर झालेला निसर्गाचा कोप यामुळे भातशेती अडचणीत आली असल्याची व्यथा शेतकर्‍यांनी मांडली. पांडुरंग बर्‍हे, नंदलाल गाढवे, संदीप गवारे, लालचंद पाटील, रमेश गव्हाणे, सतू साबळे, निवृत्ती कोकणे, हरिश्चंद्र लंगडे, अशोक बांबळे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. बैठकीनंतर शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना या प्रश्नाची जाणीव करून दिली. बाजार समिती व प्रशासनाने लक्ष घालून भात उत्पादक शेतकर्‍यांना दरवाढीबाबत न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. दखल न घेतल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी व सहकारमंत्री तसेच आदिवासी विकासमंत्री यांची भेट घेऊन दाद मागू, असा इशारा देण्यात आला.

शासनाचे अनुदान बंद; शेतकरी अडचणीत
गेल्या दोन वर्षांपासून केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारा प्रतिक्विंटल 700 रुपये बोनस मागील सरकारने बंद केल्याने शेतकर्‍यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गतवर्षी शासनाने घोषित केलेले अनुदान तत्काळ देऊन पुन्हा एकाधिकार खरेदी योजना तत्काळ सुरू करण्याची मागणी या बैठकीत शेतकर्‍यांनी केली.

आयात तांदूळ घोटीच्या नावावर विकला जाऊ नये
इगतपुरी तालुक्यातील शेतकरी हा प्रामाणिक असून दर्जेदार उत्पादन निर्मितीकडे त्याचा कल आहे. मात्र बाजारपेठेत परप्रांतातून मोठ्या प्रमाणात तांदूळ आयात केला जातो. त्यावर प्रक्रिया करून तो घोटीच्या नावावर विक्री होतो. त्यामुळे बाजारपेठ बदनाम होत आहे. आयात केलेला तांदूळ घोटीच्या नावावर विकला जाऊ नये, अशी मागणी पांडुरंग बर्‍हे यांनी केली.

हेही वाचा:

Back to top button