पुणे : पथ विभागाचा अजब कारभार ; पदपथाची उंची रस्त्याच्या समपातळीवरच | पुढारी

पुणे : पथ विभागाचा अजब कारभार ; पदपथाची उंची रस्त्याच्या समपातळीवरच

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पादचार्‍यांच्या सोयीसाठी महापालिकेच्या पथ विभागाकडून सातारा रस्त्यावरील पंचमी हॉटेल चौकात पदपथाचे काम हाती घेतले आहे. मात्र, पदपथाची उंची रस्त्याच्या समपातळीवरच ठेवण्यात आल्याने पालिकेच्या पथ विभागाच्या अजब कारभाराचा एक वेगळाच नमुना उजेडात आला आहे. सातारा रस्त्यावरील पंचमी चौक ते महात्मा जोतिबा फुले चौक (राजीव गांधी ई-लर्निंग) यादरम्यानच्या रस्त्यावर विकास आराखड्यामध्ये 24 मीटर रुंदीचा मंजूर आहे. मात्र, हा रस्ता जागेवर कुठे 13, तर कुठे 15 मीटर रुंदीचा आहे. अतिक्रमणामुळे या रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. या रस्त्याच्या दक्षिणेकडील बाजूस पदपथ आहे. या पदपथाची उंची कुठे रस्त्यापासून वर, तर कुठे रस्त्याच्या समपातळीवर आहे. ज्या ठिकाणी पदपथ रस्त्याच्या समपातळीवर आहे, तेथे वाहने पदपथावरच पार्किंग केलेली असतात. तर रस्त्याच्या उत्तरेस असलेला पदपथ रस्त्यापेक्षा सात ते आठ इंच खाली आहे. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूने खोलगट पट्टा निर्माण झालेला आहे. त्या पट्ट्यात वाहने पार्किंग केलेली असतात.

दरम्यान, रस्त्याच्या उत्तरेकडील बाजूस पंचमी चौकापासून नव्याने पदपथ तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम रस्त्याच्या समपातळीवर असलेल्या जुन्या पदपथाचे पेव्हिंग ब्लॉक काढून त्या ठिकाणीच ते लावले जात आहे. विशेष म्हणूजे, नव्याने केली जाणारी रुंदी जुन्या पदपथापेक्षा कमी झाली आहे, शिवाय पदपथाचीही उंची रस्त्याच्या समपातळीवरच ठेवण्यात आली आहे. तर रुंदी कुठे तीन फूट तर कुठे चार फूट आहे.  वाहनांच्या गर्दीतून नागरिकांना सुरक्षितपणे चालता यावे, यासाठी रस्त्याच्या बाजूला पदपथ केले जातात. रस्त्यावरील वाहने पदपथावर येऊ नये, पदपथ मोकळा राहावा, यासाठी पदपथाची उंची रस्त्यापेक्षा वर ठेवली जाते. मात्र, या ठिकाणी रस्त्याच्या समपातळीवरच पदपथाची उंची ठेवली जात आहे. त्यामुळे पदपथावर वाहने येऊ शकतात. प्रशासनाचा व ठेकेदाराचा हा प्रताप पदपथाच्या उद्देशालाच हरताळ फासणारा आहे.

Back to top button