प्रकाश आंबेडकर : सत्तेत आल्यास जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणार | पुढारी

प्रकाश आंबेडकर : सत्तेत आल्यास जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

‘वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास 2005 नंतर शासकीय सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करू’, असे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नाशिक जवळील अंजनेरी परिसरात पार पडली त्यात हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य कार्यकारिणीच्या दोन दिवसांच्या बैठकीत संघटन बांधणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच अन्य निवडणुकांत पक्षाचे धोरण काय असेल, तसेच कुणाबरोबर युती करावी आदी विषयांवर गहन चर्चा झाली. प्रत्येक सदस्यांनी आपली मते मांडली. 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे सत्तेत आल्यास या कर्मचाऱ्यांना दिलासा म्हणून त्यांच्यासाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या या बैठकीस प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष किसन चव्हाण, धैर्यावर्धन पुंडकर, नागोराव पांचाळ, दिशा पिंकी शेख, सोमनाथ साळुंखे, गोविंद दळवी, अनिल जाधव, सर्वाजित बनसोडे, सिद्धार्थ मोकळे, प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद, प्रियदर्शि तेलंग तसेच निमंत्रित सदस्य अशोक सोनोने, कुशल मेश्राम, विष्णु जाधव, महिला आघाडी महासचिव अरुंधती शिरसाठ, उत्तर महाराष्ट्र महासचिव वामन गायडवाड, जिल्हाध्यक्ष पवन पवार, महानगर प्रमुख अविनाश शिंदे आदी उपस्थित होते.

बैठकीत राजकीय मुद्यांवर आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अन्य निवडणुका कोणत्या मुद्यांवर लढवाव्यात, तिकीट वाटपासाठी कोणते निकष ठरवावे या विषयांवर मुद्देसूद चर्चा होऊन त्याबाबतचे विविध ठराव बैठकीत संमत झाले.

नव्या राजकीय समीकरणाची धडकी

ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकला दिलेली धावती भेट आणि आता पुन्हा राज्य कार्यकारिणीच्या निमित्ताने नाशिकला त्यांचे झालेले आगमन आणि दोन दिवस त्यांनी ठोकलेला मुक्काम यामुळे वंचित बहुजन आघाडीने नाशिककडे विशेष लक्ष केंद्रित केल्याचे कटाक्षाने निदर्शनास येत असल्याने अन्य पक्षांच्या उरात धडकी भरू लागली आहे. त्यातच बाळासाहेब आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एका कार्यक्रमानिमित्त एकाच मंचावर आल्याने नवे राजकीय समीकरण येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान बाळासाहेबांच्या सानिध्यात राहता येत असल्याने तसेच त्यांचे मौलिक मार्गदर्शन मिळत असल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे.

हेही वाचा :

Back to top button